बीड

श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावात शिवजयंती उत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा

श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावात शिवजयंती उत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा
श्रीवर्धन (संदेश घोलप): श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील ग्रामस्थ तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शिवजयंतीच्या निमित्ताने गावातून शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान घरोघरी महिलांनी औक्षण करून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. संपूर्ण गावात ढोल-ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याची आठवण करून दिली. शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्य, न्याय, शौर्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांचा आजच्या पिढीने अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुजित भाई तांदळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मा. सरपंच जगन्नाथ चाळके,मुंबई कुणबी समाज मा.अध्यक्ष सुभाष घोलप, गावचे प्रमुख सल्लागार, ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, नवतरुण मंडळाचे पदाधिकारी, जय भवानी महिला मंडळ तसेच धारवली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवकांनी विशेष पुढाकार घेतला. ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर भाषणे, घोषणाबाजी आणि प्रेरणादायी विचार मांडण्यात आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना आणि स्वराज्याच्या विचारांबद्दल नवचैतन्य निर्माण झाले.
धारवली गावामध्ये दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीदेखील गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळाली असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला
Back to top button