
खोटा इतिहास समाजास घातक – शिवराज बांगर
बीड (प्रतिनिधी)- इतिहासाशी प्रामाणिक राहून इतिहास लेखन होणे गरजेचे आहे, अतिरंजीत व खोटा इतिहास हा समाजाच्या एकात्मतेस बाधक असल्याचे प्रतिपादन शिवराज बांगर यांनी केले. बीड जिल्हा इतिहास परिषद व मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित बीड जिल्हा स्थानीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण प्रसंगी बांगर बोलत होते. या प्रज्ञाशोध परीक्षा इतिहासकार डॉ सतीश साळुंके यांनी खास शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या ‘गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची’ या पुस्तकावर आधारित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शिक्षण समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे होते. हा कार्यक्रम तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला प्रसिद्ध रंगकर्मी मुकुंद धुताडमल तसेच प्राचार्य जे. एम. पैठणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. शिवराज बांगर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा प्रमाणित सत्य इतिहास महाराष्ट्र पुढे आणण्याचे श्रेय डॉ. सतीश साळुंके यांना जाते. त्यांच्यामुळे हजारो शालेय विद्यार्थ्यांना बीडचा इतिहास कळतोय. प्रा. प्रदिप रोडे अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, इतिहास परिषदेचा हा उपक्रम स्तुत्य असून पुढेही सर्वतोपरी आपण या सहकार्य करू. डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ज्यांना इतिहास कळणार नाही ते इतिहास घडवू शकत नाही. या दृष्टीने इतिहास परिषदेचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. सतीश साळुंके यांनी प्रास्ताविकात म्हटले की, बीड जिल्हा स्थानीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेला जिल्ह्यातून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. येत्या १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामावर आधारित प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येणार असल्याचाही त्यांनी सांगितलं. यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातून जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनात क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व एकूण दहा हजार रुपयांची बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. त्याच प्रमाणे विविध शालेय स्तरावर क्रमांक पटवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. इतिहासाच्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अण्णासाहेब गडदे, मंगेश रोटे, श्यामराव गर्जे, अश्रूबा गायकवाड, सुनील सोनवळकर, रघुनाथ तावरे, परमेश्वर शेळके या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तर परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे सर्वोत्कृष्ट बालकलावंतांचा पुरस्कार अर्णव प्रदीप ससाने या परिवर्तनच्या बालकलावंताला बहाल करण्यात आला. अधिकाधिक विद्यार्थी सहभागाचा करंडक चंपावती महाविद्यालयाने पटकावला. कार्यक्रमास जिल्ह्यातून विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी आले होते. प्राचार्य जे. एम. पैठणे यांनी शेवटी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मुळे, आण्णासाहेब गडदे, मंगेश रोटे व परिषदेच्या अन्य सदस्यांनी सहकार्य केले



