बीड

गोदा ते नर्मदा जलयात्रेचा भव्य प्रारंभ २५ एप्रिलपासून

गोदा ते नर्मदा जलयात्रेचा भव्य प्रारंभ २५ एप्रिलपासून

अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाला नवसंजीवनी – डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

जामखेड :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ हा उपक्रम जलसंवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्म यांचा संगम घडविणारा ठरणार असून या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. चौंडी येथे झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, या जलयात्रेमुळे पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. जलसंवर्धनाच्या कामांना चालना मिळेल आणि राज्यातील विविध नद्यांचे जल एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाईल. या यात्रेत आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन यात्रेला प्रारंभ होईल. नाशिक, सिन्नर, संगमनेर, शिर्डी, अहिल्यानगर, संभाजीनगर, कन्नड-चाळीसगाव मार्गे धुळे येथे मुक्काम करत २९ एप्रिल रोजी माहेश्वर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की,गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ ही प्रभावी ठरणार आहे.दि. २५ एप्रिल रोजी चौंडी येथून जलयात्रेला प्रारंभ होणार असून दुसरी जलयात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघेल. ही जलयात्रा जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती करेल. चौंडी येथून निघणाऱ्या यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून सीना नदीचे पवित्र जल व भूमीची माती घेऊन यात्रा मार्गस्थ होईल.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंह, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, चेअरमन आजिनाथ हजारे, रविंद्र सुरवसे, अंकुश ढवळे,भाजपा शहर तालुकाध्यक्ष संजय काशिद, ग्रामीण तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, राष्ट्रवादी युवती नेत्या संध्या सोनवणे,सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, नगरसेविका नंदा होळकर,पांडुरंग उबाळे, सचिन पोठरे,अमित चिंतामणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button