बीड

अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे

अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२३) : बीड तालुक्यातील च-हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तब्बल ९ वर्षांनंतर अखेर वीजजोडणी मिळाल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे केंद्र सुरुवातीपासूनच विजेअभावी निष्क्रिय अवस्थेत होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला.
विजजोडणी नसल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नव्हते. प्रसूती, शस्त्रक्रिया व आंतररुग्ण विभागाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी बीड शहरात जावे लागत होते. परिणामी नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षांपासून विविध आंदोलनांचा मार्ग अवलंबण्यात आला. रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन यांसह अखेर च-हाटा येथील काकदरा साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आरोग्य केंद्राच्या विद्युतीकरणासाठी निधी मंजूर केला.
दरम्यान, यापूर्वी १६ लाख रुपयांचा निधी दोन वेळा उपलब्ध होऊनही बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तो अखर्चित राहिल्याने काम रखडले होते. अखेर जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून विद्युत रोहित्र बसविणे व इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली.
वीजजोडणी झाल्यामुळे आता आरोग्य केंद्रात नियमित सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून परिसरातील रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे. तसेच बीडला उपचारासाठी जाण्याचा आर्थिक भुर्दंडही वाचणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.
या यशाबद्दल डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, बप्पासाहेब पवार, मनोज तांदळे, सुभाष बांगर, संपत नागरगोजे, सूर्यकांत नागरगोजे, हरिश्चंद्र जाधव, भगिरथ उबाळे आदी आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांचे आभार मानले आहेत.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)
मो. ८१८०९२७५७२dat
Back to top button