बीड

स्कूलबस अपघातात २२ विद्यार्थी किरकोळ जखमी

स्कूलबस अपघातात २२ विद्यार्थी किरकोळ जखमी

पवनी/भंडारा : पवनीहून भिवापूरकडे जात असलेल्या स्कूलबसला निलज फाटा येथे गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अपघात झाला. प्रसंगावधान दाखविणाऱ्या चालकामुळे मोठी दुर्घटना टळली असून, २२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बस मध्ये एकूण २३ प्रवासी होते २२ विद्यार्थी व एक केअरटेकर उपस्थित होते.
विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, भिवापूर येथील ही बस रोजच्या मार्गाने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दहाचाकी टिप्परने बसच्या दिशेने अचानक वाट धरली. धक्का टाळण्यासाठी चालकाने बस बाजूला घेतली, मात्र नियंत्रण सुटल्याने बस रोडलगतच्या झाडाला जाऊन धडकली.
धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. पालक व ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, भिवापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असून फक्त किरकोळ दुखापती झाल्याची माहिती दिली.
अपघातानंतर काही पालकांनी चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याची शंका व्यक्त केली होती; परंतु वैद्यकीय अहवालात चालक नशेत नसल्याचे स्पष्ट झाले. प्रसंगावधान, वेळेवर घेतलेला निर्णय आणि तातडीची मदत यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
विद्यार्थी सुरक्षित असल्याने पालकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभाग आणि प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.
Back to top button