बीड
“श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा; नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जीवाशी खेळ!”

“श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा; नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जीवाशी खेळ!”
श्रीवर्धन (संदेश घोलप): श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या अंडरग्राउंड उच्चदाब विद्युत लाईन टाकण्याच्या कामात गंभीर अनियमितता उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांकडून तांत्रिक नियम, सुरक्षा निकष आणि पर्यावरणीय कायद्यांचे उघड उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला थेट धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समोर आलेले चित्र अत्यंत चिंताजनक आहे. उच्चदाबाच्या केबल्स ज्या खोलीत टाकणे बंधनकारक आहे, त्या ऐवजी अत्यंत कमी खोलीत टाकून काम उरकले जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. अशा प्रकारे ‘दिसण्यासाठी काम’ करून मोठा अपघात घडण्याची शक्यता वाढवण्यात आली आहे. उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याचबरोबर, रस्त्यालगत गेल्या चार-पाच वर्षांत जतन करून वाढवलेली झाडे कोणतीही परवानगी किंवा पर्यावरणीय नियम न पाळता निर्दयपणे तोडण्यात येत आहेत. ग्रामस्थ, सेवाभावी संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नातून उभे राहिलेले हरित वैभव काही क्षणांत नष्ट केल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कंत्राटदार मनमानी करत असल्याचा आरोपही जोर धरत आहे.
नागरिकांच्या ठाम मागण्या :
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
सुरू असलेले काम त्वरित थांबवून, तांत्रिक निकषांनुसार नव्याने आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यात यावे.
“दखल नाही तर आंदोलन!”
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि कंत्राटदारावरच राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या गंभीर प्रकारामुळे श्रीवर्धनमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



