बीड

श्रीवर्धनमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्याच्या दहशतीत ग्रामस्थ, वनविभागावर गंभीर आरोप

श्रीवर्धनमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्याच्या दहशतीत ग्रामस्थ, वनविभागावर गंभीर आरोप

श्रीवर्धन(संदेश घोलप) : श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिक अक्षरशः भीतीच्या छायेत जगत आहेत. जावेळे आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये सलग दोन दिवस बिबट्याने वासरांवर हल्ले करून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे.
मात्र या गंभीर परिस्थितीत वनविभागाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि निष्क्रिय असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “तीन माणसांचे बळी गेल्याशिवाय कारवाई करणार नाही,” अशी धक्कादायक भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारी नियमांनुसार ४८ तासांत पंचनामा करणे बंधनकारक असताना, वनविभाग मात्र २४ तासांच्या अटीचा हवाला देत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात अधिकारी उशिरा घटनास्थळी पोहोचतात, कोणताही अधिकृत पंचनामा न करता फक्त फोटो काढून निघून जातात, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
नुकसान भरपाईचा प्रश्न तर अधिकच गंभीर बनला आहे. अद्याप एकाही पीडित शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नसल्याने संताप उफाळून आला आहे. “फोटो काढून नेण्यामागचा खरा उद्देश काय? या फोटोंच्या आधारे कुठे गैरव्यवहार तर होत नाही ना?” असा थेट संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक शेतकरी विजय रंगले यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले, “आमच्या जनावरांचे नुकसान झाले, पण ना मदत मिळते ना न्याय. अधिकारी फक्त फोटो काढून जातात. आम्ही कोणाकडे दाद मागायची? प्रशासन झोपले आहे का?”
परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आता तरी राज्य सरकार आणि वनमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून ठोस कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Back to top button