बीड

पंचनामे त्वरित करा, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत आंदोलन – मंगेश (दादा) आजबे

पंचनामे त्वरित करा, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत आंदोलन – मंगेश (दादा) आजबे

धनेगावमध्ये पुराचे तांडव;अडकलेले चौघे सुरक्षित बाहेर

जामखेड तालुक्यात रविवार रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जामखेड शहरासह तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. याचा फटका तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्यांना चांगलाच बसला.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव खैरी नदीच्या काठावर अडकलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना प्रशासन व धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

रविवारी रात्री धनेगाव, खर्डा, जातेगाव, दिघोळसह अनेक गावात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे खैरी तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे धनेगाव परिसरातील खैरी नदीला पूर आला.

या नदीकाठी असलेले बाळासाहेब ढाळे कुटुंबातील रंगनाथ ढाळे (वय ६८), बाबुराव बाळासाहेब ढाळे (वय २१), मंगल बाळासाहेब ढाळे (वय ४५), वाळासाहेब ढाळे (वय ५३), असे एकाच कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यांच्या घराला पहाटे साडेतीनच्या सुमारास नदीच्या पुराने वेढा घातला. हे कुटुंब रात्रभर पाण्यात अडकून पडले.

रात्रभर ढाळे कुटुंब जागेच होते. तसेच घरातही पुराचे पाणी गेले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. ही माहिती मिळताच धनेगाव येथील ग्रामस्थ पोहोचले. तसेच प्रशासनाचे अधिकारीही दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश आजबे यांनी देखील भेट दिली. एनडीआरएफची टीम येणार होती, मात्र तोपर्यंत नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने ग्रामस्थांनी नदीत उतरून ढाळे कुटुंबातील चार जण व जनावरांना बाहेर काढले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेश आजबे यांनी धनेगाव येथील शेतकऱ्यांना धीर दिला. धनेगावसह जातेगाव, दिघोळ परिसरातील घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट तातडीने पंचनामे करावेत. तसेच प्रशासनाने हलगर्जीपणा केला अथवा सरसकट पंचनामे केले नाहीत तर तालुक्यातील शेतकऱ्यांसह मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आजबे यांनी दिला.
यावेळी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, मंगेश आजबे, ग्रामस्थ कैलास जाधव, विजय भोरे, शाखा अभियंता गणेश काळे, सुजित गोडगे, तलाठी विकास मोराळे, सर्कल नंदकुमार गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button