संपादकीय

पालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, इडीकडे तक्रार करतो; सोमय्यांचा विरोधकांना आव्हान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्री , खासदार आणि आमदारांचे घोटाळे बाहेर काढले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील घोटाळे बाहेर काढा असे आव्हान दिले होते आता या आव्हानावर बोलताना सोमय्या यांनी थेट राऊत यांना आव्हान दिले आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा केवळ आरोप महापालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे. मात्र त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिले जात नाहीत. खासदार संजय राऊत यांच्याकडे मी पुरावे मागितले मात्र त्यांनी अद्यापपर्यंत पुरावे दिलेले नाहीत. आपण पुरावे द्या, या भ्रष्टाचाराबाबत इडीकडे मी स्वत: तक्रार करण्यास तयार असल्याचे थेट आव्हान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरीतील विरोधकांना दिले आहे. भाजपच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

किरीट सोमय्या यावेळी म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत मला पत्र दिले. त्यासोबत त्यांनी १७ ते १८ पेपर दिले. त्यात ईडी संबंधित एकही पत्र नव्हते. तर त्यातील सहा पत्र ही पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारींची होती. ईडीकडे तक्रार करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याबाबत ठोस कागदपत्रे, पुरावे द्यावे लागतात.

खासदार राऊत यांनी मला दिलेल्या पत्रात मी ईडीकडे या भ्रष्टाचाराची तक्रार करावी, असे म्हटले आहे. पण मी खासदार राऊत यांच्याकडे ईडीकडे तक्रार करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली. परंतु मला अद्याप कागदपत्रे मिळाली नाहीत. राऊत अथवा स्थानिक विरोधकांनी पुरावे दिल्यास आपण स्वत: इडीकडे तक्रार करू, अशी घोषणाच सोमय्या यांनी केल्याने आता विरोधक पुरावे देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button