📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रविवारी बीड येथे होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे – सत्संग मुंडे

रविवारी बीड येथे होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे – सत्संग मुंडे
माजलगाव येथे ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाची बैठक संपन्न
माजलगाव / प्रतिनिधी:-राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजासाठी ओबीसीकरणाचा मार्ग खुला करून दिला आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गावर मोठा अन्याय होत असून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात देशाचे ओबीसी नेते ना. छगनराव भुजबळ साहेब यांनी रणसिंग फुंकले आहे. काही झाले तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही यासाठी ना. भुजबळ यांनी लढा उभारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड येथे रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ओबीसी समाजातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांनी केले आहे.
माजलगाव येथे दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी महाएल्गार मेळाव्याच्या पूर्व तयारी संदर्भात समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. यावेळी सत्संग मुंडे बोलत होते. या बैठकीस भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सरवदे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे, परीट समाजाचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाने, माजलगाव पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद खेत्रे, संजीवनीताई राऊत, रूपमानंद खेत्रे, जगन्नाथ खेत्री, ज्ञानेश्वर कोरडे, बाबासाहेब आडाव, संतोष रासवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सत्संग मुंडे पुढे म्हणाले की, रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी बीड येथे
ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचा भव्य महाएल्गार मेळावा  आयोजित करण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटिअरच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याचा जीआर महाराष्ट्र शासनाने काढला असून यामुळे ओबीसी समाजामध्ये कमालीची भीती आणि सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध नाही मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अन्याय करणारा निर्णय महाराष्ट्र शासन घेत असल्याने या निर्णयाच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाज बांधवांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येते की काय? या भीतीमुळे ओबीसी समाजातील नागरिक आत्महत्या सारखे पाऊल उचलू लागले आहेत. यामुळे ओबीसी समाजाला धीर देण्यासाठी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण स्वतंत्र आणि अखंड ठेवण्यासाठी या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव आणि भगिनींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस माजलगाव तालुक्यातील समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button