📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आ. विजयसिंह पंडित प्रीमियर लीगमध्ये लीग फेरी संपली; नवंबिलाल मेंबर प्रस्तुत स्पर्धेत आजपासून क्वार्टर फायनलचे सामने!

आ. विजयसिंह पंडित प्रीमियर लीगमध्ये लीग फेरी संपली; नवंबिलाल मेंबर प्रस्तुत स्पर्धेत आजपासून क्वार्टर फायनलचे सामने!
फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमी आणि वायबीके टायगर्सचा विजय; विजेतेपदासाठी चुरस वाढली!
बीड दि.१८ (प्रतिनिधी) आमदार विजयसिंह पंडित प्रीमियर लीगमध्ये काल झालेल्या दोन सामन्यांसह लीग फेरी पूर्ण झाली असून आजपासून क्वार्टर फायनलचे सामने सुरू होणार आहेत. कालच्या सामन्यांत फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमीने के.एस. कन्स्ट्रक्शनवर ३० धावांनी, तर वायबीके टायगर्सने वुडलँड सीसीवर ९० धावांनी मोठा विजय मिळवला.
पहिल्या सामन्यात फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १७७ धावा केल्या. निखिल कुडकेने ४० चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६८ धावा केल्या. ओम सानपने २० चेंडूंत ३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात के.एस. कन्स्ट्रक्शनला नऊ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावाच करता आल्या. शहबाज काझीने ३५ चेंडूंत ५०, तर सार्थक छबिलवाडने २४ चेंडूंत नाबाद ४८ धावा केल्या. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमीने ३० धावांनी विजय मिळवला. निखिल कुडकेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात वायबीके टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत सर्व गडी गमावून २२८ धावांचा डोंगर उभा केला. अरमान शेखने ३० चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. रोहित जटावने ४० धावा केल्या, तर सिद्धार्थ मात्रेने शेवटच्या षटकांत आक्रमक फलंदाजी केली. वुडलँड सीसीकडून कर्णधार सय्यद एजाजने चार, तर सईद जागीरदारने दोन बळी घेतले.
२२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वुडलँड सीसीचा संघ १८.१ षटकांत १३८ धावांवर सर्वबाद झाला. निशांत मस्केने ३७ चेंडूंत ४३, तर सरफराज मोमीनने २३ धावा केल्या. वायबीके टायगर्सने हा सामना ९० धावांनी जिंकला. अरमान शेखला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आजपासून क्वार्टर फायनलचा थरार
लीग फेरी संपल्यानंतर आता स्पर्धेच्या बाद फेरीला सुरुवात होत आहे. आज सकाळी नवले वॉरियर्स विरुद्ध वुडलँड सीसी, तर दुपारच्या सत्रात एसकेपी विरुद्ध फ्रेंड्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आता प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार असून कोणता संघ विजेतेपद पटकावतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Back to top button