📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेडमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस; चार नागरिक जखमी

जामखेडमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस; चार नागरिक जखमी

जनावरांच्या हल्ल्यांनी शहरात चिंतेचे वातावरण

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गायींच्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तपनेश्वर महादेव मंदिर परिसरातील सेंच्युरी शाळेजवळ एका महिलेला गायीने शिंग मारल्याने त्या जखमी झाल्या. तसेच महावितरण (एमएसईबी) कार्यालयाशेजारील कुंभारतळे परिसरातही एका महिलेवर गायीने हल्ला केला.

यानंतर डोके किराणा परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या महिलेला गायीने धडक देऊन जमिनीवर पाडले व शिंगाने मारल्याने ती जखमी झाली. तपनेश्वर रोड आणि खाडे नगर परिसरातही हल्ल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले असून मोकाट जनावरांच्या हल्ल्यांनी शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनांची माहिती मिळताच नगरसेवक राजेंद्र गोरे, युवा नेते प्रवीण होळकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी पाठविण्यास मदत केली.तसेच या मदतीसाठी संतोष नवलाखा, सचिन देशमुख आणि विकास परदेशी यांनी सहकार्य केले.मोकाट गाय पकडण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला मात्र सुमारे एक तास कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, एमएसईबी परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने भटकी जनावरे व कुत्र्यांचा वावर वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जामखेडकरांकडून होत आहे.

Back to top button