पोलीस स्टेशनसमोरच साखळी चोरांचा धाडसी प्रयत्न; महिलांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पोलीस स्टेशनसमोरच साखळी चोरांचा धाडसी प्रयत्न; महिलांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
पोलीस स्टेशनसमोर साखळी चोरीचा प्रयत्न म्हणजे शहराच्या सुरक्षिततेवर घाला – रोहिणी काशिद
जामखेड प्रतिनिधी :जामखेड शहरात सध्या साखळी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस स्टेशनसमोरच घडलेल्या धाडसी चोरीच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज संध्याकाळी ७.४२ ते ७.५० या वेळेत जामखेड पोलीस स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.
एक महिला आपल्या स्कुटीवरून घराकडे जात असताना मागून आलेल्या वेगवान दुचाकीवर दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मिनी गंठण व दागिने हिसकावण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यातील एका इसमाने महिलेच्या स्कुटीचा हँडल ओढून गाडी वळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र सदर महिला अत्यंत सतर्क असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत कोपराने एका चोराच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे चोरांची दुचाकी असंतुलित झाली. चोरांनी गाडी महिलेच्या अंगावर सोडून देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात महिला खाली पडून हाताला दुखापत झाली, परंतु त्यांच्या खांद्यावर पदर घट्ट बांधलेला असल्यामुळे गळ्यातील दागिने चोरांच्या हाती लागले नाहीत.
विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनसमोरच घडली असूनही चोर इतक्या धाडसाने कृत्य करण्यास धजावले, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, अशीच एक घटना सारोळा रोड परिसरात सायंकाळी ४.४५ वाजता सुमारास घडल्याची माहिती समोर आली असून अवघ्या एका तासाच्या अंतराने शहरात दोन साखळी चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.सध्या संक्रांतीनंतर हळदी-कुंकवाचे दिवस सुरू असून, महिलांची वर्दळ वाढलेली आहे. याचाच गैरफायदा घेत साखळी चोर सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
प्रतिक्रिया
———————————
पोलीस स्टेशनसमोरच महिलांवर साखळी चोरीचा धाडसी प्रयत्न होणे हे अत्यंत धक्कादायक व संतापजनक आहे. ही घटना केवळ एका महिलेवरील हल्ला नसून संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेवरचा घाला आहे.
साखळी चोरीचे वाढते प्रकार चिंताजनक असून पोलीस यंत्रणा सतर्क होणे गरजेचे आहे,महिलांची सुरक्षितता ही मागणी नाही, हक्क आहे.महिलांची सुरक्षितता हक्काची जबाबदारी आहे.महिलांनीच स्वतःचे रक्षण करावे, संक्रांतीनंतरच्या हळदी-कुंकवाच्या काळात साखळी चोर सक्रिय झाले असून पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी. महिलांनी दागिने घालून जाताना खबरदारी घ्यावी.
रोहिणी संजय काशिद
अध्यक्षा – महिला शिवजन्मोत्सव समिती, जामखेड



