📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

शिवसेनेच्या सहा नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देणार; –सुधीर सूर्यवंशी

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

अंजनगाव सुर्जी : नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन निवडून आलेल्या सहा नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, या घटनेचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता सुमारास अंजनगाव सुर्जी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना (उबाठा) पक्षाचे संपर्कप्रमुख तथा उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेऊन मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला होता. मात्र काही नगरसेवकांच्या निर्णयामुळे पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, संबंधित सहा नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षांतर्गत नियमांनुसार कायदेशीर व संघटनात्मक पातळीवर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा पाठिंबा आणि संख्याबळ उपलब्ध असतानाही वेगळा निर्णय का घेण्यात आला? याबाबत सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, अक्षय गवळी यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, अक्षय गवळी हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला असता, निवडणुकीनंतर त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज केल्याची माहिती पक्षाला त्या वेळी नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. पंकज मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यास ती संवादातून दूर केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मागील निवडणुकीतील मताधिक्याच्या आधारे संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाने घडवलेल्या काही कार्यकर्त्यांनी वेगळा मार्ग निवडणे ही खंतजनक बाब असल्याचे मत सुधिर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. भविष्यात उमेदवार निवडीत पक्षनिष्ठा आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या दोन्ही बाबींचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी येथील युवा सेना शहरप्रमुख अक्षय गवळी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत काही दिवसांपुर्वी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन पक्षातील अंतर्गत निर्णयप्रक्रिया व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

एकूणच या घडामोडींमुळे अंजनगाव सुर्जीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांसमोर संघटनात्मक आव्हाने निर्माण झाली असून, पुढील काळात पक्ष कोणती भूमिका घेतो व कोणते निर्णय होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला पक्षाचा कोणताही स्थानिक पदाधिकारी उपस्थित नव्हता, ही बाबही चर्चेचा विषय ठरत आहे.

Back to top button