बीड
ग्रामपंचायतीकडे २५ लाखांचा निधी शिल्लक, तरी शेडाळा गाव रस्त्याविना!

ग्रामपंचायतीकडे २५ लाखांचा निधी शिल्लक, तरी शेडाळा गाव रस्त्याविना!
ग्रामसभेतील आठ दिवसांत रस्ता सुरू करण्याचे आश्वासन हवेतच; ग्रामस्थांमध्ये संताप, पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा
आष्टी प्रतिनिधी :
शेडाळा ग्रामपंचायतीकडे सुमारे २५ लाख रुपयांचा निधी शिल्लक असल्याची चर्चा असताना गावात ये-जा करण्यासाठी आजही नागरिकांना योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे गावाला जाण्यासाठी चांगला रस्ता का नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दि. ६ ऑक्टोबर रोजी शेडाळा येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी गावात जाण्यासाठी योग्य रस्ता तयार करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केली असता, सरपंच तसेच ग्राम रोजगार सेवक यांनी आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन देऊन बराच कालावधी उलटूनही प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने या आश्वासनाचे पुढे काय झाले, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामसभेत दिलेली आश्वासने ही केवळ बोलण्यापुरती नसून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी विश्वासाने मांडलेल्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावात जाण्यासाठी लवकरात लवकर योग्य रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा आष्टी पंचायत समितीसमोर यापूर्वी कधीही झाले नसतील अशा विविध प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य किरण साळवे, अण्णासाहेब म्हस्के, किशोरदादा म्हस्के, समाजसेवक बाळासाहेब आडसरे व कृष्णा वाघमारे यांनी दिला आहे.
आता ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन रस्त्याच्या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.



