बीड

बीड जिल्ह्याने पाहिलेले विकासाचे स्वप्न सुनेत्र ताईंच्या माध्यमातून पुर्ण होईल — अमरसिंह पंडित

बीड जिल्ह्याने पाहिलेले विकासाचे स्वप्न सुनेत्र ताईंच्या माध्यमातून पुर्ण होईल — अमरसिंह पंडित

==================
अजितदादांच्या आठवणी बीडकरांनी जागवल्या
==================
बीड येथे शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
===================
बीड दि.३०(प्रतिनिधी) दोन दिवस झाले तरी दादा आपल्यात नाहीत असे मनाला पटत नाही दादांच्या जाण्याने बीड सह महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अजित दादांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही. बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेने अजित दादा यांच्या माध्यमातून पाहिलेले विकासाचे स्वप्न उपमुख्यमंत्री सुनेत्राताईच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करत स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी भावनिक उजाळा दिला. यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार व अजित दादा प्रेमी मोठ्या संख्येने शोकसभेला उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने बीड येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या. अतिशय शोकाकुल वातावरणात अजितदादांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार भिमराव धोंडे, बाळासाहेब आजबे, उषाताई दराडे, संजय दौंड, राजेंद्र जगताप नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, सुशीलाताई मोराळे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर चव्हाण म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन काम करताना शिव- शाहु- फुले- आंबेडकर विचाराला कधी दादांनी बगल दिली नाही, त्यांचे अकाली जाणे सर्वांना वेदना देऊन गेले होते. बीडला बारामती करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी तसा शब्द दिला होता. उमेदीच्या काळात एक सक्षम नेतृत्व हरपले आहे. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या आहेत तेव्हा एकजुटीने पुन्हा हा विकास पुढे घेवून जाऊ. दादांच्या स्वप्नातला हा बीड जिल्हा निर्माण करुया असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित म्हणाले की, दादा आपल्यात नाहीत हे अजूनही मनाला पटत नाही, दादा बीडचे पालकमंत्री झाले आहेत, आपल्या बीड जिल्ह्याचे चित्र बदलणार असे सर्व सामान्य जनतेला वाटत होते पण नियतीने दादांना हिरावून नेले आहे, त्यामुळे खुप नुकसान झाले आहे. शेवटच्या घटकाच्या घरापर्यंत अवकळा पसरली आहे, आपला माणूस गेल्याची भावना प्रत्येक माणसाची आहे. दादा केवळ पहिल्या बाकावरच्या आमदारांचे नव्हते तर ते शेवटच्या बाकावर बसणा-या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करणारे होते. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जेंव्हा लिहिला जाईल तेव्हा दादांना वगळून हा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, दादा हे या शतकाचे जननायक आहेत. तत्वाशी तडजोड न करणारा नेता आपल्यातून गेला हे अतिशय वाईट झाले आहे. दादा गेल्याचे दु:ख मलाच नाही तर प्रत्येक सामान्य माणसाला आहे. बीड जिल्ह्यातील आम जनतेने पाहिलेले स्वप्न सुनेत्रा ताईंच्या रुपाने होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे कल्याण आखाडे म्हणाले की, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख महाराष्ट्रभर होती. विकासाभिमुख नेतृत्व म्हणून दादा सर्वपरिचित होते. मोठी संधी दादामुळे मला मिळाली.
सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे म्हणाल्या की, आम्हाला दादा का भावले तर दादांनी आम्हाला कधीच अंतर दिले नाही. आमच्या सुख दुःखात धाऊन आले. दादांचे बीडचे आपुर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करु.
माजी आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की, दादांच्या लाखो आठवणींने आमच्या मनात गर्दी केली आहे. दादा कामाचा माणूस होते. आपल्या जिल्ह्याला असा माणूस पालकमंत्री म्हणून मिळाले होते, पण त्यांचे जाणे आपल्यासाठी दूर्देव आहे.
माजी आमदार उषाताई दराडे, अजितदादा हे शरद पवार साहेबांच्या कुशित तयार झालेले व्यक्तिमत्व होते. दादा सारखे नेतृत्व पुन्हा घडावे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे काम करावे.
माजी आमदार भिमराव धोंडे म्हणाले की, अजितदादांचे कृषी, सिंचन, शिक्षण, समाज, राजकारण असे सर्व क्षेत्रात भरीव काम आहे. अजितदादांची जागा भरुन काढण्याचे काम करावे.
माजी आमदार राजेंद्र जगताप म्हणाले की, सर्वांना समान न्याय देण्याचे काम दादांनी केले. सिंचनाच्या बाबतीत आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी दादांनी आपले जीवन अर्पण केले. या मातीशी नाते तोडून, कार्यकर्त्यांना सोडून का गेलात… दादा परत या…परत या… अशा ओळी त्यांनी सादर केल्या.
माजी आमदार संजय दौंड म्हणाले की, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे. जशी बारामती उभी केली तसे मला बीडला उभे करायचे आहे, असा शब्द दादांनी दिला होता. आपण सर्वांनी आता अजितदादा यांचा वादा पुर्ण करावयाचा आहे.
नगरसेवक अमर नाईकवाडे म्हणाले की, अजितदादा हा नेता आम्हाला त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भावला. त्यांच्या विचाराने आपण यापुढे काम करु. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक म्हणाले की, दादांच्या कामाचा उरक आणि स्पष्टवक्तेपणा हे गुण आम्ही अंगिकारु, जेष्ठ नगरसेवक मोईन मास्टर म्हणाले की, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारे, अन्यायाला वाचा फोडणारे अजितदादा एक हिरा होते, तो हिरा आता आपल्यातून हरपला आहे. दादांचे कार्य आपण सर्वांनी पुर्ण करावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने दादासाहेब मुंडे म्हणाले की, ६५ वर्षांच्या महाराष्ट्रात ६६ वर्षांचा उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थमंत्र्यांची यशस्वी परंपरा पुढे नेली. सिंचन क्षमता वाढली पाहिजे त्यामुळे शेतीचा विकास होणार हा विचार करणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, त्यामुळे आपले खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दिलेला संदेश आणि विचार घेऊन आपण पुढे जावूया.
शिवसंग्रामचे अनिल घुमरे म्हणाले की, स्व. विनायक मेटे गेल्यानंतर आमच्या अडचणीच्या काळात दादांनी आम्हाला बळ दिले. अजितदादा आणि मेटे यांच्या विचारांवर आपण यापुढील काळात काम करु.
भारतीय जनता पक्षाचे शंकर देशमुख दादांचा आदर्श घेऊन काम करु असे ते म्हणाले, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख रफिक म्हणाले, शिस्त आणि वक्तशीरपणा हा गुण दादांचा आपण सर्वांनी या निमित्ताने घेतला पाहिजे.
बीड नगर परिषदेचे गटनेते फारुख पटेल म्हणाले की, मुस्लिम समाजाला सत्तेत मोठा वाटा देण्याचे काम अजितदादांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अशोक लोढा म्हणाले की, अल्पसंख्याक अशा जैन समाजाला राजकारणाच्या प्रवाहात आणण्याचे काम अजितदादा पवार परिवाराने केले
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप म्हणाले की, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना आंदोलने केली, त्यातून आम्हाला खुप कांहीं शिकायला मिळाले. आज दादा आपल्या नाहीत, फार वाईट वेळ आपल्यावर आली आहे. चांगले माणसं अकाली जाणे बीडचे दुर्दैव आहे. अजित दादा आज आपल्यात नाहीत पण प्रत्येकाच्या मनात आहेत. अजितदादांचे राहिलेले काम अमरसिंह पंडित यांनी यापुढे पूर्ण करावे.
सरपंच संघटनेच्या वतीने कुंडलिक खांडे म्हणाले की, दादा एक धडाडीचे नेतृत्व होते. काम तडीस लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बीडला चांगला पालकमंत्री मिळाला होता, त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी कृती समितीचे मारोती तिपाले, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. पिसोरे, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, सि ए असोसिएशनचे सि.ए. बी.बी. जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वरेकर, आंबेडकर चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते अजय सवाई, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गंगाधर काळकुटे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Back to top button