बीड
जि. प. लिंबागणेश सर्कलमध्ये झेंडा कुणाचाही असो, नेतृत्व आमचंच असेल – जिल्हाध्यक्ष रतन गुजर

जि. प. लिंबागणेश सर्कलमध्ये झेंडा कुणाचाही असो, नेतृत्व आमचंच असेल – जिल्हाध्यक्ष रतन गुजर
बीड (प्रतिनिधी):
लिंबागणेश सर्कलमधील गुजर समाजाची सामाजिक व राजकीय ताकद एकवटण्यासाठी समाजाच्या तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांचे मत सविस्तरपणे जाणून घेतले जाणार असून, समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होऊ नयेत, यासाठी एकमताने निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे.
गुजर समाजाच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि समाजाची एकसंघ भूमिका कायम ठेवण्यासाठी, पंचायत समिती सदस्य पदासाठी जो राजकीय पक्ष गुजर समाजाला अधिकृत उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या पाठीमागे संपूर्ण समाजाने एकदिलाने व ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे. “झेंडा कुणाचाही असो, नेतृत्व मात्र गुजर समाजाचेच असेल,” असा स्पष्ट संदेश यावेळी जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी दिला.
समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत, कोणाचेही वैयक्तिक हेवे-दावे, पक्षीय नाते-संबंध, तसेच वैयक्तिक राजकीय भूमिका बाजूला ठेवून गुजर समाजाची संघटित ताकद एकत्र आणण्याचे आवाहन रतन गुजर यांनी केले. समाज एकत्र राहिल्यास आगामी निवडणुकांमध्ये गुजर समाजाचा निर्णायक प्रभाव अधिक भक्कमपणे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची स्वतंत्र बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर समाजहिताचा व सर्वमान्य असा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात येईल. गुजर समाजाने संघटितपणे भूमिका घेतल्यास पंचायत समितीच्या राजकारणात समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


