📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आष्टीत अवैध कत्तलखान्यांचा आरोप; पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह

आष्टीत अवैध कत्तलखान्यांचा आरोप; पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह
गाई-वासरांचे अवशेष शिवारात; कारवाई न झाल्यास गणपती फाटा येथे रास्ता रोकोचा इशारा
आष्टी (प्रतिनिधी )कासारी-मुर्शदपूर हद्दीतील वारूंगळे वस्ती व शिंदेवाडी शिवारात गाई-वासरांचे मुंडके व मांसाचे अवशेष आढळत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकरी व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी तालुका पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरातील कत्तलखाने बंद असून पोलिसांची नियमित गस्त सुरू असल्याचा दावा केला जात असेल, तर मग शिवारात हे अवशेष येतात कुठून? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
कत्तलखाने बंद असल्याचे सांगूनही मांसाचे अवशेष खुलेआम शिवारात आढळत असतील, तर पोलिसांची गस्त नेमकी कुठे आणि कोणासाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या अवशेषांचा उगम शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच आष्टी शहरातील कथित अवैध दारूविक्रीवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दारूबंदी विभागाचे कार्यालय शहरात असतानाही अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप असेल, तर यंत्रणा नेमकी करतेय तरी काय? असा सवाल करण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास मुलाबाळांसह गणपती फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता पोलिस प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनावर आष्टी शहराचे नगराध्यक्ष जीया बेग,सरपंच अशोक मुळे,नगरसेवक रंगनाथ धोंडे, सुनील रेडेकर, ग्रामपंचायत सदस्य कपिल अग्रवाल, बंडू गीते, मनोज धनवडे,सचिन काकडे, रामदास दरेकर, अमोल दरेकर,संतोष खंडागळे, बाबासाहेब वारंगुळे, शुभम दरेकर, हनुमंत काकडे,सुनील वारंगुळे, लहू केरळकर, दीपक वारंगुळे, वाल्मीक वारंगुळे, बंडू केरुळकर,शहादेव केरूळकर, चंद्रकांत वारंगुळे, वाल्मीक वारंगुळे, प्रकाश वारंगुळे,यश केरूळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*चौकट*
पोलिसांचा तो खबऱ्या कोण?
आष्टी शहरात अवैध कत्तलखाने आणि अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना मिळते; मात्र कारवाईसाठी पोलीस ज्या दिशेने निघतात, त्याआधीच संबंधितांना खबर मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे, पोलीस ज्या दिशेने कारवाईसाठी जातात, त्याच दिशेने पोलिसांमधीलच एक कथित खबऱ्या फिरत असल्याची चर्चा असून, पोलीस येत असल्याची खबर तोच संबंधितांना देतो आणि त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्व काही ‘साफ’ झालेले असते, अशी नागरिकांमध्ये कुजबुज आहे.
जर ही चर्चा खोटी असेल तर पोलिसांनी ती खोटी असल्याचे स्पष्ट करावे; आणि खरी असेल तर पोलिसांच्या हालचालींची माहिती बाहेर कोण पोहोचवत आहे, याचा शोध घेण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आष्टीकर विचारत आहेत.
पोलिसांच्या कारवाईपूर्वीच आरोपी सावध होतात, तर पोलिसांच्या यंत्रणेतच ‘खबर’ कुठे लीक होते? या प्रश्नाचे उत्तर आता पोलिस प्रशासनाने जनतेला द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
Back to top button