दर्यापुरात वाढत्या अपघातांमुळे युवासेनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अमरावती|दर्यापूर शहरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता दर्यापूर शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीवर सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन दर्यापूर यांना निवेदन दिले.
निवेदनात शहरातील मुख्य रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने लहान वाहने, दुचाकीस्वार, वृद्ध, जेष्ठ नागरिक, महिला, पादचारी तसेच विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अपघातांची संख्या वाढत असून याला आळा घालण्यासाठी जड वाहतुकीवर वेळेची मर्यादा घालणे आवश्यक असल्याचे मत युवासेनेने व्यक्त केले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, युवासेना तालुका प्रमुख सागर गिऱ्हे, युवासेना शहर प्रमुख रुपेश मोरे, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक बगाडे, सदाफ सुफी, उपसरपंच शरद आठवले, युवासेना उपतालुका प्रमुख आशिष लायडे, युवासेना उपशहर प्रमुख शुभम विल्हेकर, राज गुजराती, निलेश ढाकरे, गिरीश रंगारी, कलीम कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना-युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



