बीड

‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा अखेर बंदोबस्त! सीतेपार परिसर दहशतमुक्त

‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा अखेर बंदोबस्त! सीतेपार परिसर दहशतमुक्त
पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्यानंतर वनविभागाची मोठी कारवाई; ट्रॅप पिंजऱ्यात अडकला हल्लेखोर बिबट्या
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा:-सीतेपार परिसरात पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेत संपूर्ण गावात दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे. तब्बल अनेक दिवसांच्या सततच्या शोधमोहीमेनंतर वनविभागाने ट्रॅप पिंजऱ्याच्या सहाय्याने या बिबट्याला पकडले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
भंडारा वनविभागांतर्गत साकोली वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र साकोली, नियतक्षेत्र किन्ही अंतर्गत येणाऱ्या मौजा विर्शी येथे १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली होती. मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने छत्तीसगड राज्यातील बलौदा बाजार जिल्ह्यातील सुहेला येथील रहिवासी काशीराम मिरी यांची अवघ्या पाच वर्षांची मुलगी कु. अंशिका काशीराम मिरी हिच्यावर अचानक झडप घालत हल्ला केला. या भीषण हल्ल्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर विर्शीसह संलग्न गावांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. संतप्त ग्रामस्थांकडून हल्लेखोर बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत होती. त्यानुसार उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. कटरे यांनी वन्यप्राणी बचाव पथक व वनकर्मचाऱ्यांसह विशेष मोहीम राबविली.
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच भ्रमणमार्गांवर विशेष ट्रॅप पिंजरे लावून सापळा रचण्यात आला होता. अखेर ४ मे २०२६ रोजी वनविभागाने लावलेल्या एका ट्रॅप पिंजऱ्यात हा हल्लेखोर बिबट्या अडकला आणि वनविभागाची मोहीम यशस्वी ठरली. पकडण्यात आलेल्या बिबट्याला नंतर सुरक्षित निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले.
दरम्यान, मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाला सहकार्य करावे, तसेच वन्यजीव आढळल्यास तात्काळ हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईन १९२६ किंवा भंडारा वनविभाग नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१८४-२५२२८३ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
“चिमुकलीच्या मृत्यूनंतर संतप्त गावकऱ्यांना दिलासा; अखेर बिबट्या पिंजऱ्यात!”
Back to top button