📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दुष्काळात राजकारण करू नका; जिल्हा परिषद निवडणुकीत कोणात किती दम आहे, ते दाखवून देऊ!

दुष्काळात राजकारण करू नका; जिल्हा परिषद निवडणुकीत कोणात किती दम आहे, ते दाखवून देऊ!
युवा कार्यकर्ते गणेश तोडेकर यांचा विरोधकांना सडेतोड इशारा
बीड प्रतिनिधी :
बीड जिल्ह्यातील भयावह दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाळपेरा चारा पिकांची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मंकरनिका तलावातही सुमारे २०० एकर क्षेत्रावर ज्वारी आणि मका या चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, काही मंडळी पाणीटंचाईचे कारण पुढे करून या उपक्रमाबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असून, दुष्काळाच्या संकटातही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकरी आणि पशुधनाच्या हिताच्या कामात अडथळे आणू नयेत. दुष्काळात कोणीही राजकारण करू नये; जिल्हा परिषद निवडणुकीत कोणात किती दम आहे, ते आम्ही दाखवून देऊ, असा सडेतोड इशारा युवा कार्यकर्ते गणेश तोडेकर यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर गाळपेरा चारा पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून यशवंत बहुउद्देशीय संस्थेला मनकर्णिका तलावात गाळपेरा लागवडीची परवानगी मिळाली. खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयराजे पंडित, राजेंद्र मस्के आणि परिसरातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी शासनाकडून एक रुपयाचेही अनुदान घेतले जात नाही. केवळ सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला जात आहे. गाळपेरा पद्धतीने घेतलेल्या चारा पिकांना प्रामुख्याने एक पाण्याची गरज असून, दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध होणे हीदेखील पाण्याइतकीच महत्त्वाची गरज आहे. मात्र, या उपक्रमाला विरोध करणाऱ्यांना शेतकरी आणि पशुधनापुढील संकटाचे गांभीर्य समजत नसल्याचे तोडेकर यांनी म्हटले.
गाळपेरा चारा पिकांचा हा उपक्रम शेकडो शेतकरी आणि त्यांच्या पशुधनासाठी आधार ठरणारा आहे. अशा विधायक कामात सहकार्य करण्याऐवजी काही विघ्नसंतोषी मंडळी जाणीवपूर्वक विरोध करून जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. या विरोधामागे कोण आहे, याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे, राजकीय कुरघोड्या करणे नव्हे. विरोधकांनी आपली ताकद दाखविण्याची एवढीच इच्छा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असा ठाम विश्वासही गणेश तोडेकर यांनी व्यक्त केला.
जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राजेंद्र मस्के यांनी वेगवेगळ्या जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवून विजयाचा गुलाल उधळला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. हा इतिहास विरोधकांनी विसरू नये, असेही तोडेकर यांनी ठणकावून सांगितले.
Back to top button