बीड
तपनेश्वर शाळेचा २० फुटी रस्ता खुला करा; अन्यथा बेमुदत उपोषण

तपनेश्वर शाळेचा २० फुटी रस्ता खुला करा; अन्यथा बेमुदत उपोषण
नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांना आम आदमी पार्टीचे निवेदन
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बंद असलेला २० फुटी मुख्य रस्ता तातडीने खुला करावा. तसेच रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत शाळेच्या संरक्षण भिंत व गेटचे बांधकाम थांबवावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी केली आहे. यासंदर्भात आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांना निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सभापती श्रीराम डोके, नगरसेवक हर्षद काळे उपस्थित होते. तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक बजरंग सरडे, शहराध्यक्ष अजय भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळू जाधव, सागर भोसले, प्रवीण उगले, दादा महाडिक, मनोज कार्ले, अनिल लोखंडे, राहुल भागवत, विश्वजीत शिरोळे, राहुल क्षिरसागर, दीपक शेळके, सोहम जगताप, अनिकेत साठे, फिरोज पठाण, ज्ञानेश्वर चिलगर, अक्षय काटकर, धवल लुंकड, राजेंद्र शिरोळे आदी पालक व नागरिक उपस्थित होते.
तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे १५६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेच्या परिसरात अंगणवाडीही कार्यरत आहे. शाळेचा मुख्य २० फुटी रस्ता बंद असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शेजारील अरुंद बोळीतून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्य रस्ता बंद असल्यामुळे शाळेसाठी लागणारे तांदूळ, शालेय पोषण आहाराचे साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू मोठ्या वाहनांतून शाळेपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी शाळेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शाळेला संरक्षण भिंत व गेट मंजूर झाले असून बांधकाम सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, मुख्य रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असताना हे बांधकाम केल्यास भविष्यात रस्ता कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकामाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक व नकाशाची तपासणी करून अधिकृत मोजणीद्वारे रस्त्याची हद्द निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शाळेचा मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करून खुला करावा, रस्त्याचे मुरुमीकरण करावे, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त स्थळपाहणी करावी आणि पालकांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सात दिवसांच्या आत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास पालक, शाळेचे हितचिंतक व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संतोष नवलाखा यांनी दिला आहे.



