बीड

मुंबई-पुण्याला वीज पुरवण्यासाठी बीडच्या ग्रामीण भागाचा पुरवठा खंडित?

मुंबई-पुण्याला वीज पुरवण्यासाठी
बीडच्या ग्रामीण भागाचा पुरवठा खंडित?
बदामराव पंडित संतप्त; तीव्र आंदोलनाचा इशारा
गेवराई ( प्रतिनिधी ) सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट असून पावसाळाही तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त आहेत. शेती मशागतीची कामे, उभ्या पिकांना पाणी देणे तसेच लघुउद्योग आणि व्यावसायिक उपक्रम सुरळीत चालविण्यासाठी अखंडित वीजपुरवठ्याची आवश्यकता असताना बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारंवार आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक काळ बंद ठेवला जात असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना मिळाली. या माहितीमुळे संतप्त झालेल्या पंडित यांनी तत्काळ महावितरणच्या लातूर परिमंडल चे अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून याबाबत जाब विचारला.
      यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, “मुंबई-पुण्यासारख्या शहरांचा वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योगधंदे चालविणाऱ्या नागरिकांवर अन्याय केला जात असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्ववत आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.”
तसेच, ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करून तो अन्य भागांकडे वळविण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत, अन्यथा शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही बदामराव पंडित यांनी दिला. यावेळी महावितरण चे अभियंता यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
    सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसांत या प्रश्नावर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Back to top button