बीड
अवमान प्रकरणी राधेश्याम अट्टलसह ट्रस्टींना नोटीस लक्ष्मीनारायण मंदिर प्रकरणात कायदेशीर कारवाई निर्णायक टप्प्यात

अवमान प्रकरणी राधेश्याम अट्टलसह ट्रस्टींना नोटीस
लक्ष्मीनारायण मंदिर प्रकरणात कायदेशीर कारवाई निर्णायक टप्प्यात
“दिशाभूल” म्हणणारे तोंडघशी; रामनाथ खोड यांचे आरोप ठरले तथ्याधारित
बीड : (दि. १५)गेवराई येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे नोंदणीकृत सार्वजनिक न्यास असून, या न्यासाच्या मालकीची मौजे कोल्हेर व मौजे लुकामसला येथे एकूण १२१ एकर जमीन आहे. मौजे कोल्हेर येथील जमीन सर्व्हे नं. ६ व ८ तर मौजे लुकामसला येथील जमीन सर्व्हे नं. ३३ व ३८ अशी नोंद आहे. सदर जमीन देवस्थानच्या मालकीची असताना तिच्या उत्पन्नाचा लाभ देवस्थानाऐवजी खाजगी व्यक्तींच्या खात्यात जात असल्याचे गंभीर आरोप यापूर्वी समोर आले होते.
या कथित भ्रष्टाचारासंदर्भात रामनाथ खोड यांनी दिनांक २१/११/२०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर धर्मदाय उप आयुक्त यांनी आदेश पारित केले होते. या आदेशाला मा. उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी धर्मदाय उप आयुक्त यांच्या आदेशाला स्थगिती देत, मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, बीड यांनी दिनांक ०५/०४/२०२१ रोजी दिलेला आदेश कायम ठेवला. सदर निर्णय मा. उच्च न्यायालयाने दिनांक ०९/१२/२०२५ रोजी दिलेल्या आदेशान्वये स्पष्ट केला आहे.
असे असतानाही न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करून देवस्थान जमिनीतील ऊस परस्पर तोडून कारखान्याला घालण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन आदेशाचा अवमान झाल्याचा ठपका ठेवत धर्मदाय प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
या अवमान प्रकरणी राधेश्याम अट्टल यांच्यासह संबंधित ट्रस्टींना अधिकृत नोटीस बजावण्यात आली असून, महाराष्ट्र सार्वजनिक न्यास व्यवस्थापन अधिनियम, १९५० अंतर्गत पुढील कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे “रामनाथ खोड दिशाभूल करत आहेत” असा दावा करणारे आरोप पूर्णतः फोल ठरले असून, संपूर्ण प्रकरण न्यायालयीन आदेश व दस्तऐवजांच्या आधारे पुढे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणामुळे सार्वजनिक न्यासांच्या मालमत्तेचे संरक्षण तसेच न्यायालयीन आदेशांच्या काटेकोर अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



