आ विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश – गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार.

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या गावातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी या पाठपुरावा केला आहे. गेवराई तालुक्यातील आगरनांदूर, हिंगणगाव, खामगाव, राक्षसभुवन, सावळेश्वर, संगम जळगाव, नागझरी यासह आदी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी आणि गुरांना पाणी मिळावे यासाठी जायकवाडी जलाशयाच्या उजव्या कालव्यातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची विनंती ठरावा द्वारे केली होती. गटविकास अधिकारी यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानंतर जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यानुसार या भागातील लोकसंख्या आणि एकूण पशुधनांची संख्या लक्षात घेऊन त्यांना लागणाऱ्या पाण्याचे मोजमाप करून पाणी सोडणे बाबतचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन टंचाईग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली.
गोदावरी नदीकाठच्या गावातील शेतकरी व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांनी तत्परता दाखविली, त्यांच्या पाठपुराव्यामुळे सध्या सुरू असलेल्या पाणी पाळी मधून वितरिका क्रमांक चार मधून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जाणार आहे. गोदावरी नदीकाठच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामपंचायतीने सुद्धा यापूर्वी प्रशासनाकडे ठराव देऊन पाणी सोडण्याची मागणी केली आहे. अद्याप जालना जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले नसल्यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणारे एकूण पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येणार आहे त्यामुळे वाढते तापमान नदीपात्रातील वाळू उपशामुळे हे पाणी शहागड बंधाऱ्यापर्यंत न जाता नदीपात्रातच झिरपण्याची शक्यता जास्त आहे.
आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रशासकीय पातळीवरील पाठपुराव्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याचे आदेश दिले असते तरी जालना जिल्हा प्रशासनाकडून पाणी सोडण्याचे आदेश कधी होतात ? याकडे जायकवाडी प्रशासनाचे लक्ष लागले आहे.



