
आधी स्वतःला घडवा, देश आपोआप घडेल – पी. व्ही. बनसोडे
तुलसी शैक्षणिक समूहात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बीड (प्रतिनिधी): देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. आपण प्रत्येक जण मोठे झालो आणि स्वतःला सक्षम केले, तर देश आपोआप घडेल आणि प्रगती करेल, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी केले.
तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्याचे प्रमुख अतिथी पी.व्ही. बनसोडे यांच्या हस्ते सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
या सोहळ्यास तुलसी आयटी कॉलेजचे प्राचार्य डी. जी. निकाळजे, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्या डॉ. अश्विनी बेद्रे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश ढोकणे, तुलसी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य शुभम जोगदंड, माता रमाई नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अबरार पठाण आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. डी. डी. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचा योग्य आणि सकारात्मक वापर झाला पाहिजे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर योग्य खर्च होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत राष्ट्रउभारणीत आपले योगदान द्यावे,असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डी. जी. निकाळजे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण ठेवून राष्ट्राप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे तसेच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करत लोकशाही मूल्यांचे जतन केले पाहिजे. तर प्राचार्य प्रकाश ढोकणे यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेऊन जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता लांडगे यांनी केले, तर प्रा. प्राची पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व शाखांचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



