बीड

श्रीवर्धन प्रशासनाचा अंगावर येणारा ‘कचरा’! कंत्राटी सफाई कामगारांचे ‘कामबंद’ आंदोलन; भ्रष्टाचाराच्या दर्पाने शहर विळख्यात?

श्रीवर्धन प्रशासनाचा अंगावर येणारा ‘कचरा’! कंत्राटी सफाई कामगारांचे ‘कामबंद’ आंदोलन; भ्रष्टाचाराच्या दर्पाने शहर विळख्यात?
श्रीवर्धन नगरपरिषदेत कामगारांच्या रक्ताची होळी! कंत्राटदाराची मुजोरी की प्रशासनाचे वरदहस्त? ‘देवेंद्र भुसाणे’ कडाडले; महाआंदोलनाचा इशारा!
श्रीवर्धन (संदेश घोलप):
ऐतिहासिक आणि पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन शहराच्या स्वच्छतेचा कणा असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मिरवणाऱ्या श्रीवर्धन नगरपरिषदेचा खरा ‘मळभ’ आता चव्हाट्यावर आला आहे. ज्या हातांनी शहर चकाचक ठेवले, त्याच हातांना हक्काच्या घासापासून वंचित ठेवणाऱ्या निर्दयी प्रशासनाविरुद्ध कंत्राटी सफाई कामगारांनी आता एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले आर्थिक शोषण आणि प्रशासनाची मुजोरी यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आजपासून ‘अनिश्चितकालीन कामबंद’ आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे.प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदाराच्या अघोरी नफेखोरीमुळे शेकडो कामगारांचे भविष्य टांगणीला लागले असून, या अन्यायाविरोधात आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. “कामगारांच्या घामाचा पैसा चोरणाऱ्यांना श्रीवर्धनच्या रस्त्यावरून फिरू देणार नाही,” असा संतप्त इशारा शिवसेना गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी दिला आहे.
भ्रष्टाचाराचा ‘कॅन्सर’: सरकारी तिजोरीतून ६२७, कामगारांच्या हातात फक्त ३३३!
नगरपरिषदेच्या कागदोपत्री सफाई कामगारांसाठी प्रतिदिवशी ६२७ रुपये मजुरी मंजूर असताना, प्रत्यक्षात त्यांच्या पदरात केवळ ३३३ रुपये पाडले जात आहेत. दिवसाढवळ्या होणारी ही लूट म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार नसून कामगारांच्या हक्कावर टाकलेला दरोडा आहे. उर्वरित २९४ रुपये नक्की कोणाच्या घशात जात आहेत? या भ्रष्टाचाराची साखळी नगरपरिषदेच्या मुख्य दालनापर्यंत पोहोचली आहे का? असा रोखठोक सवाल आता विचारला जात आहे.
देवेंद्र भुसाणे यांची आक्रमक प्रतिक्रिया:
या संदर्भात बोलताना देवेंद्र भुसाणे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. ते म्हणाले,
 “श्रीवर्धनला स्वच्छ ठेवणाऱ्या हातांनाच आज भीक मागण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. कंत्राटदाराची एवढी हिंमत होतेच कशी की तो सरकारी नियमा धाब्यावर बसवून कामगारांचे निम्मे पैसे हडप करतो? पगार नाही, सुरक्षा साधने नाहीत, पीएफचा पत्ता नाही – हे प्रशासन चालले आहे की गुंडाराज? जर येत्या ४८ तासांत कामगारांचा थकीत पगार आणि मजुरीतील तफावत दूर झाली नाही, तर आम्ही नगरपरिषदेच्या उंबरठ्यावर उग्र आंदोलन करू. कामगारांच्या चुली पेटल्या नाहीत, तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्याही उबदार राहू देणार नाही!”
सुरक्षा वाऱ्यावर, जीव धोक्यात!
कचरा डेपो आणि शहरातील गटारे साफ करताना या कामगारांना साधे हातमोजे किंवा गमबूट पुरवले जात नाहीत. अनेक कामगार आजाराच्या विळख्यात आहेत, मात्र त्यांना ई.एस.आय (ESI) किंवा विम्याचे कवच दिले गेलेले नाही. “समान काम, समान वेतन” या कायद्याची श्रीवर्धनमध्ये अक्षरशः पायमल्ली होत आहे.
प्रशासनाला शेवटचा इशारा!
कामगारांनी पुकारलेल्या या ‘वेमुदत कामबंद’ आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे आरोग्य धोक्यात आले असताना दुसरीकडे प्रशासन कंत्राटदाराला पाठीशी घालण्यात मग्न असल्याचा आरोप होत आहे. लेखी आश्वासन आणि पूर्ण थकीत पगार मिळाल्याशिवाय एकही कामगार हातात झाडू घेणार नाही, या भूमिकेवर सर्व कामगार ठाम आहेत.
आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. जर हे आंदोलन चिघळले, तर श्रीवर्धनच्या इतिहासातील हे सर्वात मोठे लोकआंदोलन ठरेल, यात शंका नाही!
Back to top button