जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आ. सुरेश धस यांच्या हस्ते वृक्षारोपण व जनजागृती अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आ. सुरेश धस यांच्या हस्ते वृक्षारोपण व जनजागृती अभियान
आष्टी (प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आवाहनानुसार आष्टी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल व टायगर अकॅडमी येथे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
“एक वृक्ष – हरित भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल” हा संदेश देत आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी शहरासह संपूर्ण मतदारसंघात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून नागरिकांना वृक्षसंवर्धन,प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी बोलताना आ.सुरेश धस म्हणाले,पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे नमूद करून वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. भावी पिढ्यांना स्वच्छ, निरोगी आणि हिरवेगार पर्यावरण देण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“हरित उद्यासाठी वृक्षारोपणाचा संकल्प” या घोषवाक्यासह संपन्न झालेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण झाली. वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उपस्थितांनी हरित, स्वच्छ आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, नगरसेवक अरुण निकाळजे, सभापती सुरेश वारंगुळे, नगरसेवक इर्शान खान, नगरसेवक बाळासाहेब घोडके, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, नगरसेवक अक्षय धोंडे, सुरज रोकडे, ज्ञानेश्वर राऊत, टायगर अकॅडमीचे साबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



