बीड

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे म्हणून उन्हाळी सुट्टी द्यावी : लेक लाडकी अभियानाची मागणी

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे म्हणून उन्हाळी सुट्टी द्यावी : लेक लाडकी अभियानाची मागणी
बीड (प्रतिनिधी ) : राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडीतील लहान बालकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना उष्णतेच्या तीव्रतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अंगणवाड्यांना तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी “लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्य”च्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. डी. जी. तांदळे , मातृभूमी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजयजी तांदळे यांनी जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांची भेट घेऊन दिनांक 15 मे 2026 शुक्रवार रोजी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या वाढत्या उष्णतेमुळे लहान बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांना पुरेसे वायुवीजन, पंखे, शुद्ध पिण्याचे थंड पाणी आदी सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत. त्यामुळे उष्णतेमुळे बालकांना डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, त्वचारोग तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली असताना अंगणवाड्या मात्र सुरू ठेवण्यात आल्याने बालकांच्या उपस्थितीमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. पालकांमध्येही आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमध्ये “टेक होम रेशन”च्या माध्यमातून आहाराचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बालकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा लेक लाडकी अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी दिली.
Back to top button