महाराष्ट्र

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रमाणपत्र शुल्कवाढ तात्काळ थांबवा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रे व विविध सेवांच्या शुल्कात करण्यात आलेली मोठ्या प्रमाणातील वाढ त्वरित मागे घ्यावी, अशी आशयाची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाप्रमुख आकाश खारोडे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन सादर करत सात दिवसांच्या आत निर्णय मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यापीठाने उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यमापन शुल्कात 20 रुपयांवरून 100 रुपये, दुय्यम अथवा तात्पुरत्या गुणपत्रिकेच्या शुल्कात 100 रुपयांवरून 500 रुपये, तसेच दुय्यम पदवी प्रमाणपत्र शुल्कात 400 रुपयांवरून 1000 रुपये अशी अवाढव्य वाढ केली आहे. याशिवाय तब्बल 42 प्रकारच्या प्रमाणपत्रे व इतर सेवांच्या शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकरी, मजूर, कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. त्यामुळे सदर शुल्कवाढ विद्यार्थ्यांना परवडणारी नसून त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच सात दिवसांच्या आत शुल्कवाढीचा निर्णय रद्द न झाल्यास प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘प्रहार-शैलीत’ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख आकाश खारोडे, समर्थ डवरे, ऋषिकेश ठवकर, विशाल आवारे, ऋषी पोहोकर, आकाश टापरे, रोहित शहाणे, रुद्रेश सायंडे, प्रज्वल भोकसे, कुणाल नागे, निखिल ठाकरे, ऋषी धाबे, सार्थक याउल, भूषण डोंगरे, कार्तिक फिसके, आशिष बंड, अनुज घावडे तसेच अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button