पाली येथे संत तुकाराम व संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा;माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती

पाली येथे संत तुकाराम व संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा;माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती
पाली/प्रतिनिधी
येथील ग्रामस्थांच्या वतीने आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मंगल प्रसंगी राज्याचे माजी मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी विशेष उपस्थिती लावून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.ए.राऊत यांनी केले. त्यांनी सांगितले की,गावात विठ्ठल मंदिर असावे अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची इच्छा होती.जागेची उपलब्धता झाल्यानंतर १० ते १५ गुंठ्यांच्या जागेत गावकऱ्यांनी स्ववर्गणी आणि श्रमदानातून हे भव्य मंदिर साकारले आहे.या कार्यासाठी गावातील महिला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या भाविकांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमात बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,संतांचे विचार हे समाजाला दिशा देणारे आहेत.आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुले आणि तरुण पिढीवर होणारे परिणाम चिंताजनक आहेत. अशा वेळी धर्माच्या नावाखाली होणारा संकुचितपणा सोडून संतांच्या समतेच्या विचारांची गरज आहे.अंधश्रद्धेला थारा देऊ नका असे सांगत श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धेपासून दूर राहून सारासार विचार करणे गरजेचे आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांतून जीवनाचे सार मिळते.वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे,जे कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले
या सोहळ्याला ह.भ.प. हरिहर महाराज,विवेकानंद महाराज,ह.भ.प.प्रशांत क्षीरसागर महाराज,तानाजी कदम,विलास बडगे, बाळासाहेब,उमेश लांडगे, दिलीप राऊत,सुभाष क्षीरसागर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”सर्व धर्माचा मूळ गाभा एकच आहे,”असा संदेश देत जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामस्थांच्या या विधायक कार्याचे कौतुक केले.यावेळी पाली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


