बीड

गुन्हेगारांना वाचवणार्‍यांचे ‘सातबारा’ उघड करू – ॲड डॉ अरुण जाधव

गुन्हेगारांना वाचवणार्‍यांचे ‘सातबारा’ उघड करू – ॲड डॉ अरुण जाधव

महिला संघटना, नेते मंडळी झोपलेत का?वंचित बहुजन आघाडीचा सवाल

आहिल्यानगर प्रतिनिधी – एकीकडे आदिवासी बहिणींवर अत्याचार होत असताना महिला संघटना कुठे झोपल्या आहेत? या अत्याचारांना आळा घालण्यासाठी आदिवासी नेते, मंत्रीमंडळ, आयोग, शासकीय यंत्रणा तसेच आमदार आणि खासदार हे सगळे झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत का? असे प्रतिपादन ॲड डॉ अरुण जाधव यांनी केले.

कापुरवाडी ता.जि.अहिल्यानगर येथील आदिवासी भिल्ल समाजातील माहिला व बांधवांना जिवंत मारण्याच्या हेतूने हाणमार करणाऱ्या गावगुंडाना त्वरित अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कारवाई करण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी दि.२० जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता अहिल्यानगर पोलीस अधिक्षक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आक्रोश मोर्चाची सुरवात रयतेचे राजे शिवछत्रपतींच्या मुर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव,एकलव्य आघाडीचे राज्य अध्यक्ष अनिल जाधव,
जिल्हा अध्यक्ष योगेश साठे , शहराध्यक्ष हनीफ शेख,एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष परवेज अशरफी, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे,एकलव्य आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम, पोपट सरोदे,राजीव भिंगारदिवे, इस्माईल शेख, आण्णासाहेब गायकवाड, देविदास पवार, मनोज साळवे, नरसिंग भोसले, अशोक मोरे आदी आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना जाधव म्हणाले की,गुन्हेगारावर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात गुन्हेगारांसह जबाबदार नेत्यांच्या सात पिढ्यांचा ‘सातबारा’ काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले की, अन्याय करणाऱ्यांविरुद्ध गलवारी किंवा कोणतेही हत्यार उचलू नका.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचे सर्वात मोठे आणि प्रभावी हत्यार दिले आहे. हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा योग्य वापर करा. या प्रस्थापितांना (पाटलांना) जे फॉर्च्युनर गाड्यांमध्ये बसून भिल्ल, दलित, मुस्लिम वस्त्यांमध्ये मतांसाठी फिरतात, अशांना हाकलून लावा. आपल्या माणसाला मतदान करा. तेव्हाच हा अन्याय संपेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी समाजावर योजनाबद्ध पद्धतीने अन्याय केला जात आहे. बिनबुडाचे आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवले जाते.गेल्या काळात सुद्धा आम्ही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. मात्र, येथील धनदांडगे प्रस्थापित मला सांगतात की, ‘आमच्या गावातील वातावरण दुषित करू नकोस, आम्ही गुण्यागोविंदाने नांदतो.’ हे कसले गुण्यागोविंद? जेव्हा आदिवासींच्या हक्कांवर गदा येते तेव्हा हा गुण्यागोविंदा दिसत नाही. तसेच येथील साहेबांचे कार्यकर्ते देखील म्हणतात की, ‘तालुक्यात असे काही घडले तर आमच्या साहेबांची पत घसरेल.’ म्हणजे साहेबांची पत वाचवण्यासाठी आदिवासींवर अन्याय चालू ठेवायचा का?
आंदोलनाच्या सांगता प्रसंगी अहिल्यानगर चे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन या घटनेबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

Back to top button