बीड

लिंबागणेश मुख्यचौक पुन्हा रक्तरंजित; गतिरोधकाअभावी अपघातांची मालिका सुरूच

लिंबागणेश मुख्यचौक पुन्हा रक्तरंजित; गतिरोधकाअभावी अपघातांची मालिका सुरूच
रस्ते सुरक्षा समितीच्या आदेशालाही MSRDC कडून केराची टोपली ? ग्रामस्थांचा संताप :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.०९ ) :  बीड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अहमदपूर–अहिल्यानगर मार्गावरील लिंबागणेश येथील मुख्यचौकात  काल दि.०८ शुक्रवारी रात्री सुमारे पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. बजाज कंपनीची डिस्कवर दुचाकी आणि सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी  रक्तचा सडा पडला होता.
स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ धाव घेत जखमी युवकाला रुग्णवाहिकेद्वारे बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, लिंबागणेश मुख्यचौकात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे डॉ . गणेश ढवळे आणि हरिओम क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दि.२६ जुन २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि रस्ता सुरक्षा समितीचे सचिव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड रविंद्र तोंडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली होती. या अनुषंगाने त्यांच्या अहवालानंतर
जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष विवेक जॉन्सन यांनी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांना संबंधित ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे लेखी आदेश दिले होते.
मात्र, आदेशानंतर तब्बल ६ महिने उलटूनही MSRDC विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे “जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवली जात आहे का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
“या चौकातून दररोज शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यास जिल्हा प्रशासन आणि MSRDC विभाग जबाबदार राहील,” असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button