बीड
आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी – मनोज जाधव

आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी – मनोज जाधव
आरटीई शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनला मुदतवाढ
२५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणीला २७ जानेवारीपर्यंत संधी
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३८ शाळांची नोंदणी
बीड (प्रतिनिधी) राज्यात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनला बीड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनसाठी २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, दिलेल्या वाढीव मुदतीत शिक्षण विभागाने सर्व पात्र शाळांची नोंदणी पूर्ण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते व आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.
यापूर्वी शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ९ ते १९ जानेवारीदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १३८ शाळांचीच नोंदणी आरटीई पोर्टलवर झाली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधी मर्यादित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने शासनाने शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनची लिंक कार्यान्वित केली होती. विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना या कालावधीत नोंदणी करणे बंधनकारक होते. मात्र, तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव, प्रशासकीय कारणांमुळे आणि शाळांच्या उदासीनते मुळे अनेक शाळांची नोंदणी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. तेव्हा शिक्षण विभागाने जलद गतीने कारवाई करत शाळा नोंदणी पूर्ण करावी अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे. २७ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नारायण ई-टेक्नो स्कूलची नोंदणी अपेक्षित
नारायण ई-टेक्नो स्कूल सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून, शासनाच्या नियमानुसार यावर्षी या शाळेची आरटीई पोर्टलवर नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळेची तातडीने आरटीई अंतर्गत नोंदणी करून घ्यावी, अशी मागणीही मनोज जाधव यांनी केली आहे.


