बीड
“संविधानाचा मान ठेवा, भीमजयंतीच्या परवानग्या रोखू नका”

“संविधानाचा मान ठेवा, भीमजयंतीच्या परवानग्या रोखू नका”
बीड जिल्ह्यात भीम जयंतीसाठी डॉल्बीला परवानगी द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी
बीड प्रतिनिधी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाते. सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या या उत्सवात लाखो अनुयायी सहभागी होत असतात.
यंदाच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या In Re: Noise Pollution (2005) 5 SCC 733 या निर्णयाचा दाखला देत, डेसिबल मर्यादेत डॉल्बी (साऊंड सिस्टिम) वापरण्यास परवानगी द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) व 19(1)(b) नुसार नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततामय एकत्र येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव साजरा करणे हा पूर्णतः संविधानिक अधिकार आहे.
मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून डॉल्बी साऊंड सिस्टिमवर पूर्णतः बंदी घालणे, जाचक अटी लादणे किंवा परवानगी देण्यास टाळाटाळ करणे अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जयंती उत्सव समित्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
तसेच, बीड जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी साऊंड सिस्टिम, डॉल्बी व लाईट शो यावर आधारित व्यवसाय सुरू केला असून जयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. प्रशासनाकडून अचानक बंदी घालण्यात आल्यास त्यांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.
याशिवाय, पारंपरिक ढोल-ताशे व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत सामाजिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्नही या उत्सवातून केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी डेसिबलमध्ये डॉल्बी वापरण्यास परवानगी द्यावी, सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, जयंती समित्यांना विनाकारण त्रास देऊ नये, संबंधित पोलीस निरीक्षक व DYSP यांना योग्य मार्गदर्शन करून परवानगी देण्याचे आदेश द्यावेत, अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
चौकट :- भीम जयंती निमित्त ध्वनीप्रक्षेपक (डॉल्बी) वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच परवानगी घ्यावी. संबंधित पोलीस ठाण्यातून विधिवत अर्ज करून परवानगी मागावी ज्या ठिकाणी पोलीस निरीक्षक परवानगी देण्यास टाळाटाळ करत असतील, त्यांनी लेखी स्वरूपात परवानगी नाकारल्याचे पत्र घेणे अत्यावश्यक आहे. जर विनाकारण परवानगी नाकारली गेली, तर तो मूलभूत अधिकारांचा भंग मानून संबंधितांविरोधात थेट मा. उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाने डॉल्बीधारकांना कोणत्याही प्रकारे विनाकारण त्रास देऊ नये किंवा वेठीस धरू नये.
अजय सरवदे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी बीड


