महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी शहराला गढूळ पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अंजनगाव सुर्जी: शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गेल्या काही दिवसांपासून करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अत्यंत गढूळ व दूषित स्वरूपाचा असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य नसून त्यामध्ये माती, गाळ आणि अशुद्ध कण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शहरातील अनेक प्रभागांमध्ये हीच स्थिती असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे हे जीवन प्राधिकरणाचे कर्तव्य असताना संबंधित विभागाच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे अंजनगावकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी उकळूनही त्यातील गढूळपणा जात नसल्याने लहान मुले, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोटाचे आजार, ताप, उलट्या, अतिसार व संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे.

शहरात नागरिकांकडुन पाणीकर नियमितपणे भरला जात असतानाही नागरिकांना शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी मिळणे ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराची ही ठळक उदाहरण ठरत आहे. नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या असल्या तरी जीवन प्राधिकरणाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

गढूळ पाणीपुरवठ्यामुळे घरगुती वापर पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कपडे धुणे, स्वयंपाक करणे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेगळ्या स्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी तात्काळ पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासून दोषी घटकांवर कारवाई करावी, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करावी तसेच शहराला त्वरित स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जर तातडीची उपाययोजना करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शहरवासीयांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रशासनाला दिला आहे.

Back to top button