
बीड तालुक्यात कोण होणार सरपंच , आरक्षण झाले निश्चित
तालुक्यातील 175 पैकी 89 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज
अनुसूचित जातीच्या 11 तर अनुसूचित जमातीच्या एका महिलेला संधी
ओबीसी महिलांपैकी 24 तर खुल्या प्रवर्गातील 53 महिला होणार सरपंच
महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम – 3 – ( अ ) , ब तसेच 4 प्रमाणे तालुका निहाय बीड जिल्हयातील 1034 ग्रामपंचायती वेगवेळया प्रवर्गासाठी व महिलासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी ( 25 मार्च ) निश्चित करण्यात आले आहे . त्यानुसार 1034 पैकी अनुसूचित जातींच्या माहिलासाठी 73 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आठ , नागरिकांचा मागास प्रवर्ग ( एसबीसी ) 142 तर खुल्या प्रवर्गातील 303 महिलांना सरपंच पदाचे आरक्षण मिळणार आहे . अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जारी केली .
हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या तालुक्यातील अनुसूचित जाती , जमाती , नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती , जमाती व मागास प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच पदे अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी राखीव ठेवताना महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियम 5 व 6 मध्ये नमुद तरतुदी तसेच ग्रामविकास विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेले शासन निर्णय , आदेश आणि परिपत्रकानुसार सरपंच पदाच्या आरक्षणाची कार्यवाही नियमानुसार पूर्ण करावी ,असे आदेशही जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील सर्व तहसीलदारांना दिले होते . याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सविस्तर प्रशिक्षण घेतले होते .
बीड तालुक्यातील एकूण 175 सरपंच पदांपैकी अनुसूचित जातीतील सर्वसाधारणसाठी 10 आणि महिलांसाठी 11 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी एक , नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी 23 तर महिलांसाठी 24 , खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी 52 आणि महिलांसाठी 53 असे सरपंच पदाचे आरक्षण असेल .
बीड तहसील कार्यालयात वरील प्रमाणे महिला आरक्षण काढण्याची प्रक्रिया मंगळवारी दुपारी अकरा वाजता सुरू झाली . यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके , नायब तहसीलदार सुहास हजारे , नायब तहसीलदार प्रशांत जाधव , अव्वल कारकून महादेव चौरे , वामन तोगरगे , संतोष मुळीक , महसूल सहाय्यक सुधाकर नागरगोजे , अमोल डोंगरे , ग्राम महसूल अधिकारी कृष्णा रत्नपारखे , दादासाहेब शेळके व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . सर्वप्रथम तालुक्यातील उपस्थित सर्व नागरिकांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येईल , याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . शिवाय कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी ती अडचण मांडावी जेणेकरून त्यांचे समाधान होईल , असे सांगितले . यावेळी लहान मुलगा श्रेयस गायकवाड याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या . ह्या प्रक्रियेची संपूर्णतः व्हिडिओग्राफी करण्यात आली . उपस्थित नागरिकांनीही सदरची प्रक्रिया अगदी सुटसुटीतपणे आणि कायदेशीरपणे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले .
.



