📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

वसंतराव नाईक विद्यालयाला मुख्यालय शिक्षक द्या

“गटशिक्षणाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व पालकांची मागणी”

🔹पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

अंजनगाव सुर्जी: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव खाडे येथील वसंतराव नाईक विद्यालय येथे वर्ग ८ वी, ९ वी आणि १० वी असून, विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे ६४ असल्याची माहिती आहे. मात्र विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक/शिक्षकांची उपस्थिती नियमित नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रभारी मुख्याध्यापक आठवड्यातून दोन ते तीन दिवसच विद्यालयात उपस्थित राहतात, तर काही वेळा ते आठवडाभर अनुपस्थित असल्याचेही सांगण्यात आले. याबाबत पालकांनी त्यांना विचारणा केली असता, संबंधित शिक्षकांकडे दोन शाळांचा अतिरिक्त भार असून, शाळेच्या कामकाजासाठी तसेच शासकीय व शैक्षणिक कामकाज बैठकींसाठी तालुका व जिल्हा ठिकाणी जावे लागते, असे कारण त्यांनी दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

यामुळे अनेकदा वर्गात तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक स्तरावरील व्यक्ती/विद्यार्थ्यांकडून शिकवणी घेतली जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे ग्रामस्थांचे व पालकांचे म्हणणे आहे. मुख्यालय शिक्षक सेवा उपलब्ध करून न दिल्यास गावातील विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून इयत्ता १० वीची परीक्षा जवळ आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी विद्यालयात मुख्यालय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

या मागणीसाठी पांडुरंग भगत, हरिदास माकोडे, भावेश माकोडे, हरिदास अस्वार, मंगेश बोटेये, मनीष इंगळे, संतोष सोनवणे, यांच्यासह गावकरी व पालक मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button