अमरावतीचा अभिमान उजळला : लक्ष्य ओलांडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यपालांकडून सत्कार

–पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी)
अमरावती : राष्ट्राभिमानाच्या पवित्र ध्वजाखाली निष्ठेने कार्य करणाऱ्या अमरावती जिल्ह्याने यंदा ध्वजदिन निधी संकलनात अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना विशेष गौरवचिन्ह आणि आपल्या स्वाक्षरीने अलंकृत प्रशस्तीपत्र प्रदान करत सन्मानित केले. मुंबईतील लोकभवनातील जय विहार येथे पार पडलेल्या या समारंभात कर्तृत्वाचा तेजस्वी क्षण उजळून निघाला.
सत्कारसोहळ्यात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाठारकर यांचीही उपस्थिती होती. अमरावती जिल्ह्यास २०२४-२५ या वर्षासाठी १ कोटी २३ लाख रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. परंतु, जिल्हाधिकारी येरेकर यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली जिल्ह्याने हे उद्दिष्ट पार करत तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलित करत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्ह्याने काही महिन्यांतच आपला इष्टांक मागे टाकत केलेले हे यश म्हणजे कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि समाजाच्या एकजुटीचे जाज्वल्य उदाहरण आहे. संकलित निधी माजी सैनिक, युद्धविधवा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी तसेच पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून अनेक कल्याणकारी योजनांना नवी दिशा मिळणार आहे.
राष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मृतीला साष्टांग नमन करत, अमरावती जिल्ह्याने ध्वजदिनाच्या कार्यात दाखविलेला हा उत्साह—एक सामाजिक मूल्यांची उज्ज्वल परंपरा पुनर्स्थापित करणारा क्षण ठरला आहे.



