बीड
निसर्गरम्य श्रीवर्धन प्रशासकीय उदासीनतेच्या विळख्यात; ‘सुसज्ज प्रशासनाचा’ बुरखा फाटला!

निसर्गरम्य श्रीवर्धन प्रशासकीय उदासीनतेच्या विळख्यात; ‘सुसज्ज प्रशासनाचा’ बुरखा फाटला!
श्रीवर्धन (संदेश घोलप):
निसर्गाचे वरदान लाभलेले आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेले श्रीवर्धन शहर सध्या गंभीर नागरी समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार, नियोजनाचा अभाव आणि वाढती लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांनाही रोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. “श्रीवर्धन सुंदर आहे, पण ते फक्त निसर्गाने… व्यवस्थेने मात्र त्याचा बोजवारा उडवला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांमधून उमटू लागली आहे.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांची ‘थंड’ भूमिका
शहरातील गद्रे नाका परिसरात वाहतुकीचे कसलेही नियोजन नसल्याचे चित्र आहे. या चौकात मध्यभागीच बॅरिकेड्स टाकून ठेवले असून, वाहनचालक कुठूनही आणि कशीही वाहने फिरवत असल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही कोंडी सोडवण्याऐवजी ड्युटीवर असलेले पोलीस मात्र रस्त्याकडेला झाडाच्या सावलीत खुर्ची टाकून बसण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
‘नो पार्किंग’चे फलक फक्त दंड वसुलीसाठीच?
श्रीवर्धन मुख्य बाजारपेठेत वाहने पार्क करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही सुसज्ज किंवा अधिकृत जागा उपलब्ध करून दिलेली नाही. मात्र, बाजारपेठेत ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’चे बोर्ड थाटण्यात आले आहेत. पार्किंगची सोय न करता केवळ वाहनचालकांकडून दंडाची सक्तीने वसुली करण्यातच प्रशासन मग्न आहे का? असा सवाल व्यापारी आणि ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
घंटागाडीसाठी करावी लागतेय विनवणी
शहरातील स्वच्छता मोहीमही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही. वारंवार फोन केल्याशिवाय कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. काही ठिकाणी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘कचरा रस्त्यावर टाकू’ असा इशारा दिल्यानंतरच यंत्रणा हलते, मात्र कर्मचाऱ्यांची वागणूक सर्वसामान्यांवर उपकार केल्यासारखी असते, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
MSEB चा लहरी कारभार; लाईट गेली की नेटवर्कही गुल!
दर मंगळवारी ५ ते ६ तास अधिकृत भारनियमन सोसावे लागल्यानंतरही, इतर दिवशी किरकोळ कारणाने किंवा ‘एखादा कावळा ओरडला तरी’ वीज गायब होते, अशी बिकट अवस्था आहे. त्यात भर म्हणजे, वीज पुरवठा खंडित होताच शहरातील मोबाईल नेटवर्कही पूर्णपणे ठप्प होते. आधुनिक युगात वीज आणि संपर्क व्यवस्था एकाच वेळी कोलमडत असल्याने श्रीवर्धनचा संपर्क थेट जगापासून तुटत आहे.
‘ब्लू फ्लॅग’ बीच की डम्पिंग ग्राउंड? पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर!
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात किनाऱ्यावर ठिकठिकाणी पसरलेला कचरा पाहता हा बीच आहे की ‘डम्पिंग ग्राउंड’, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे.
याशिवाय किनाऱ्यावर चालणारे वॉटर स्पोर्ट्स, घोडेवाले आणि बाईक रायडर्स यांच्या अनिर्बंध वावरामुळे पर्यटकांना चालणेही कठीण झाले आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी कोणतीही ठोस सुरक्षा यंत्रणा किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना दिसत नसून, पर्यटकांचा जीव पूर्णपणे नशिबाच्या स्वाधीन आहे.
खड्डेमय रस्ते आणि अपघातांना निमंत्रण
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या सुरू असलेली नवीन रस्त्यांची कामे इतकी निकृष्ट दर्जाची आहेत की, हे रस्ते आगामी पावसाळा तरी टिकतील का, याबद्दल मोठी शंका आहे. त्यातच अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकून ठेवण्यात आले आहे. यामुळे मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सवाल: कुणाला काही पडलंय का?
एकूणच श्रीवर्धनमधील परिस्थिती पाहता, येथील प्रशासन नक्की कोणासाठी काम करत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघात असो की नागरी सुविधा, “चलता है” या मानसिकतेमुळे शहराचे वाटोळे होत असून, ढिम्म प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागेल, असे चिन्ह दिसत आहे.


