“लोकजागर” लोकहितार्थ कार्याची अखंड वाटचाल

–पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;
अंजनगाव सुर्जी: “लोकजागर” ही समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारी एक निस्वार्थ, सेवाभावी संस्था आहे. सामाजिक भान, माणुसकी आणि लोकजागृती या मूल्यांवर उभी असलेली ही संघटना म्हणजे विविध क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींचा एक प्रेरणादायी परिवार आहे.
सर्वांच्या सहकार्याने आणि एकत्रित प्रयत्नांतून घडलेला हा लोकजागर परिवार कोणताही व्यक्तिगत लाभ न पाहता समाजासाठी झटत आहे. संस्थेतील पदाधिकारी व सदस्य हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व अभ्यासू असून त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
आनंद संगई व बंडू हंतोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद महल्ले, बंडू जुमळे, देवानंद माकोडे, नानाभाऊ शिंदीजामेकर, डॉ. संगीता गोविंद मेन, निता मोगरे, डॉ. कौस्तुभ पाटील, प्रशांत गोतमारे, संजय धारस्कर, संतोष गोलाईत तसेच इतर अनेक सहकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून लोकजागरचे कार्य व्यापक स्वरूपात पुढे नेले आहे.
संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, गरजू व्यक्तींना मदत, रुग्णसेवा, रक्तदान शिबिरे, सामाजिक जनजागृती असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली आहे. लोकजागरच्या कार्याची दखल घेत विविध स्तरावर पुरस्कार व सन्मानही प्राप्त झाले आहेत.
लोकजागरच्या कार्यक्षमतेवर आणि समाजासाठी दिलेल्या योगदानावर शासनस्तरावरही विश्वास व्यक्त झाला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेत पांदन रस्त्यांच्या विकासासाठी पथदर्शी (पायलट) प्रकल्प राबविण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकतेच “लोकजागर” स्वयंसेवी संघटनेची निवड करण्यात आली आहे. ही बाब संस्थेच्या प्रामाणिक कार्याची पावती असून, लोकजागर परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
लोकजागर ही केवळ एक संस्था नसून ती एक विचारधारा आहे. ज्यातून अनेक कार्यकर्ते घडले, अनेकांनी समाजसेवेची दिशा निवडली. आजही नवे चेहरे, नवी ऊर्जा आणि नवे विचार घेऊन लोकजागरचा प्रवास अखंड सुरू आहे. या कार्यामध्ये विविध सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणा व समाजातील घटकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
विश्वास, आशा आणि कृती यांचा संगम म्हणजे लोकजागर. यापुढेही निस्वार्थ भावनेने सेवा करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूर्ण, परिणामकारक व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा दृढ संकल्प लोकजागर परिवाराने केला आहे.



