बीड

सिंदखेडराजा सज्ज… ४२८ व्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी भव्य तयारी

सिंदखेडराजा सज्ज… ४२८ व्या जिजाऊ जन्मोत्सवासाठी भव्य तयारी

12 जानेवारी ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष धनंजय शेंडगे यांचे आवाहन

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व जिजाऊ सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेडराजा येथे भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.

११ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव, महिला सक्षमीकरणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, पोवाडे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, महिला सहभागातून जिजाऊंच्या संस्कारांचा जागर केला जाणार आहे.

१२ जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करून मुख्य जयंती सोहळ्यास प्रारंभ होईल. यानंतर संपूर्ण नगरातून ४२८ मशालींची भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार असून, ही यात्रा जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मवर्षाचे प्रतीक ठरणार आहे.

मुख्य सोहळा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास शिवश्री प्रतापराव जाधव, शिवश्री राजेंद्र शिंगणे, शिवश्री विजयकुमार घोगरे, शिवमती रेखाताई खेडेकर, शिवश्री मधुकर मेहकरे, शिवश्री कामाजी पवार,  शिवश्री नवनाथ घाडगे,शिवश्री चंद्रशेखर शिखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी मराठा सेवा संघ पुरस्कार २०२६ वितरण  शिवश्री कैलास काकडे, रामदास उखडूजी मुंजकर, अनंतराव दादासाहेब देशमुख व शिवाजी राऊत कोकरे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

राजमाता जिजाऊंचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान, शिवसंस्कार, स्त्रीशक्तीचा सन्मान व सामाजिक ऐक्याचा संदेश या जन्मोत्सवातून दिला जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे  जिल्हाध्यक्ष धनंजय शेंडगे यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Back to top button