बीड नगर पालिकेच्या गटनेते पदी फारुक पटेल

बीड, दि.३०(प्रतिनिधी) ः- बीड नगर पालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वात शिव-शाहू-फुले आघाडीची स्थापना झाली असून राष्ट्रवादी सह बीड शहरातील समविचारी विजयी नगरसेवकांची ऐकी झाली असून नगर परिषदेत आघाडीकडून गटनेते म्हणून ज्येष्ठ नगरसेवक फारुक पटेल यांची निवड करण्यात आली. प्रचाराच्या दरम्यान मतदारांना आम्ही पक्ष म्हणून विजयानंतर विकासाचे शब्द दिले, नागरी समस्यांचे निराकरण करू असा शब्द आम्ही प्रभागनिहाय बैठका, सभांतून दिला होता. आज बीडकरांनी अजितदादांवर विश्वास ठेऊन पुरोगामी मतांची वज्रमुठ सिध्द केली आहे. दिलेले शब्द आणि आश्वासने पाळणारी आणि सामाजिक अभिसरण आणि विकासाचे समीकरण साधणारे प्रतिनिधी मंडळ आम्ही लोकांच्या सेवेत देणार आहोत असे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले असून यावेळी त्यांनी फारुक पटेल यांचा सत्कार केला व उपस्थित विजयी नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर आघाडी नाही बांधिलकी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकर हा विचार घेऊनच पक्ष संघटन आणि निवडणुकांच्या प्रक्रियात काम करत आला आहे. बीड शहरात विजयी उमेदवारांची आघाडी स्थापन करताना देखील आ. विजयसिंह पंडित यांनी आघाडीचे नामांकरण शिव-शाहू-फुले-आंबेडकर असे सुचवले. यावर प्रतिक्रिया देताना हे केवळ आघाडीचे नाव नसून आमच्या पक्षाची सामाजिक आणि राजकीय बांधिलकी असल्याचे आ. पंडित यांनी म्हटले.



