गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी; मोठा अनर्थ टळला

गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी; मोठा अनर्थ टळला
जामखेड प्रतिनिधी (पाटोदा ग.), ३० मे:
कर्जत-जामखेड महामार्गावरील पाटोदा गरडाचे परिसरात गुरुवारी (दि. २९ मे) रात्री सुमारे २ वाजता गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर ट्रकमध्ये घरगुती वापरासाठीचे १०० पेक्षा अधिक गॅस सिलेंडर होते. ट्रक पलटी झाल्यानंतर सिलेंडर फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुदैवाने कोणताही स्फोट झाला नाही. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व सिलेंडर सुरक्षितपणे दुसऱ्या ट्रकमध्ये हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबाबत माहिती देताना पाटोदा गरडाचे येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांनी सांगितले की, “सदर घटना मध्यरात्री घडली असून सुदैवाने कोणतीही हानी न होता मोठा धोका टळला.”
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.



