बीड
शिवसेनेच्या संजय उडाण यांची उपनगराध्यक्षपदी नियुक्ती करा- अनभुले, सुरवसे

शिवसेनेच्या संजय उडाण यांची उपनगराध्यक्षपदी नियुक्ती करा- अनभुले, सुरवसे
बीड, प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसंग्राम युतीला मतदारांनी भरघोस कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, युतीचे तब्बल २२ नगरसेवकही विजयी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सलग दोन टर्मपासून नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय उडाण यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करावी, अशी जोरदार मागणी शहरभरातून होत आहे. नगरपालिकेतील दीर्घ अनुभव, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि पक्षसंघटनातील योगदान लक्षात घेता संजय उडाण हे उपनगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, बीड नगरपालिका निवडणुकीतील विजयामध्ये यथायोग्य योगदान देणाऱ्या मित्र पक्ष शिवसेनेला न्याय मिळावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक संजय उडाण यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करावी, अशी अधिकृत मागणी शिवसेना बीड विधानसभा प्रमुख सुनिल अनभुले आणि शिवसेना बीड जिल्हा संघटक सुनिल सुरवसे यांनी केली आहे. युतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखून योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असून उपनगराध्यक्ष पदाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



