बीड
४ कोटी ६० लाख रुपयांचा रस्ता… की भ्रष्टाचाराचा उघडा नागडा खेळ?

४ कोटी ६० लाख रुपयांचा रस्ता… की भ्रष्टाचाराचा उघडा नागडा खेळ?
कोंढे–पंचतन येथील मुख्यामंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावर गंभीर प्रश्न; हाताने उखडतोय डांबर, ग्रामस्थांचा संताप!
श्रीवर्धन (संदेश घोलप) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कोंढे–पंचतन गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी ६० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्याचा मोठा घोटाळा उघड झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासाच्या गाजावाजात तयार झालेला हा रस्ता अवघ्या काही दिवसांतच उखडू लागल्याने संतप्त नागरिकांनी थेट घटनास्थळी जाऊन कामाची पोलखोल केली.
४.६० कोटी गेले कुठे? रस्त्यात खडी नाही, मजबुती नाही!
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामात आवश्यक असलेली खडी, बेस लेयर आणि दर्जेदार बांधकाम साहित्य वापरण्याऐवजी थेट मातीवर डांबराचा थर टाकून कोट्यवधी रुपयांचे काम उरकण्यात आले. त्यामुळे रस्त्याचा वरचा थर आता अक्षरशः कार्पेटप्रमाणे उखडत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे.
हात लावताच डांबर निघतेय; व्हिडिओने उघड केला कथित घोटाळा
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नागरिक साध्या हाताने आणि बोटाने डांबराचा थर उचलताना दिसत आहेत. डांबर निघाल्यानंतर खाली खडीऐवजी लाल मातीच दिसत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे “हा रस्ता आहे की फक्त डांबराचा मेकअप?” असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत.
“धूळही साफ केली नाही, थेट डांबर टाकले”
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रस्त्यावरील धूळ-माती साफ न करता, कोणतीही तांत्रिक प्रक्रिया न पाळता थेट डांबर टाकण्यात आले. परिणामी डांबराला जमिनीची पकडच मिळाली नाही आणि संपूर्ण थर सुटू लागला.
“जनतेच्या कराच्या पैशांवर हा उघडपणे डल्ला नाही तर काय?”
“४.६० कोटींचा रस्ता हाताने उखडत असेल तर कामाची गुणवत्ता कुठे आहे?”
“अधिकारी आणि ठेकेदारांनी जनतेला मूर्ख समजले आहे का?”
असे संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले.
अधिकारी गप्प, ग्रामस्थ आक्रमक
रस्त्याच्या या कथित निकृष्ट कामामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. एवढ्या मोठ्या निधीच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी नेमके कुठे होते? कामाची मोजणी आणि गुणवत्ता तपासणी कोणी केली? अशा प्रश्नांनी प्रशासनाला घेरण्यास सुरुवात झाली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, कामात दोषी आढळणाऱ्या ठेकेदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“रस्ता उभा राहण्याआधीच कोसळला; आता ४.६० कोटींचा हिशोब कोण देणार?”
कोंढे–पंचतनमधील हा रस्ता सध्या विकासापेक्षा अधिक भ्रष्टाचार, निकृष्ट काम आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय ठरत आहे. आता ग्रामस्थांच्या आरोपांची सत्यता तपासून प्रशासन दोषींवर कारवाई करणार की हे प्रकरणही फाईलमध्येच दफन होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



