📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

“गोदाकाठच्या वाघाने थंडीत उघड्यावर शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडे पाहावे!” पालकमंत्री अजितदादांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा – डॉ. गणेश ढवळे

“गोदाकाठच्या वाघाने थंडीत उघड्यावर शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडे पाहावे!”
पालकमंत्री अजितदादांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा – डॉ. गणेश ढवळे

बीड | प्रतिनिधी (दि. ३०) –
माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्रांतर्गत दत्तनगर वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी अक्षरशः उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. सुसज्ज शाळा इमारत असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली, थंडी–ऊन्ह–वारा सहन करत शिक्षण घ्यावे लागत आहे.

या गंभीर प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री अजितदादा पवार व आमदार विजय­sinh पंडित यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दत्तनगर वस्ती शाळेत इयत्ता १ ते ४ चे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून २ ते ३ शिक्षक कार्यरत आहेत. २००७–०८ मध्ये शासनाने तीन वर्गखोल्यांची इमारत बांधली आहे. मात्र परिसरातील वाढलेल्या बांधकामामुळे मागील दोन महिन्यांपासून शाळेचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, निवारा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

—

👶 अंगणवाडीही बंद – बालक व गरोदर मातांचे हाल

शाळेजवळील अंगणवाडीत ६४ बालके व ५ गरोदर मातांची नोंद असून रस्ता बंद असल्यामुळे अंगणवाडीही बंद आहे. लसीकरण व पूरक आहारासाठी लाभार्थ्यांना दूर पायपीट करावी लागत असून याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

—

⚠️ आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने अखेर दि. ३१ डिसेंबर रोजी बीड येथील सहकार संकुल भवनाच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी त्यांनी “गोदाकाठचा वाघ” अशी उपाधी घेतलेल्या आ. विजय­sinh पंडित यांनी त्यांच्या गेवराई मतदारसंघातील शालेय मुलांचा रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

Back to top button