बीड
विविध सामाजिक उपक्रमांनी अनिलदादा जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

विविध सामाजिक उपक्रमांनी अनिलदादा जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बीड, प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त बीड मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून अभिष्टचिंतन करण्यात आले. रक्तदान शिबीर, अन्नदान, किराणा किट वाटप, वृक्षारोपण तसेच शालेय साहित्य वितरण यांसारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वाढदिवस साजरा केला.
बीड शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अनिलदादा जगताप यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी असंख्य महिलांनी एकत्रित येत ५६ दिव्यांनी औक्षण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त बीड शहरातील जिव्हाळा आश्रम तसेच ढेकणमोहा येथील पसायदान सेवा प्रकल्पात भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, किराणा किटचे वाटप करण्यात आले, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले.
या सर्व उपक्रमांमध्ये हजारो नागरिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्नेहीजन सहभागी झाले होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करताना अनिलदादा जगताप यांनी समाजोपयोगी कार्यांमधून जनसेवा करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याची भावना व्यक्त केली.



