बीड
आ. बाबाजी काळे यांच्या पुढाकाराने घाट परिसरात सुरक्षाव्यवस्था उभारणीला हिरवा दिवा

आ. बाबाजी काळे यांच्या पुढाकाराने घाट परिसरात सुरक्षाव्यवस्था उभारणीला हिरवा दिवा
कुंडेश्वर घाट सुरक्षिततेकडे मोठी झेप! ९५ लाखांचा निधी मंजूर
पुणे :-कुंडेश्वर मंदिर घाट परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली होती. घाटावरून दरवर्षी हजारो भाविकांची वर्दळ असताना रस्ता अरुंद, उतरणीचा आणि वळणदार असल्याने अनेकदा अप्रिय घटना घडत होत्या. याकडे लक्ष वेधत आमदार बाबाजी काळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, जिल्हा नियोजन समिती पुणे यांनी रु. ९५.७७ लाखांचा निधी मंजूर करून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निधीतून घाटमार्गावर लोखंडी सुरक्षा रेलिंग, चेतावणी फलक, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, प्रकाशयोजना, सीसीटीव्ही तसेच भाविकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
यामुळे घाट मार्ग सुरक्षित होण्याबरोबरच पर्यटकांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर व सुरक्षित ठरणार आहे. यासोबतच संवेदनशील भागात ट्रॅफिक गाईडलाइन आणि सुरक्षा कर्मचार्यांची तैनातीही विचाराधीन आहे.
आ. बाबाजी काळे म्हणाले, “घाट भागात सुरक्षात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक होत्या. शासन व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.” तसेच त्यांनी पाईट–कुंडेश्वर रस्ता सुसज्ज करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दहा कोटींचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी विनंतीही केली आहे.
या निर्णयामुळे आगामी यात्राकाळात भाविक, गावकरी आणि पर्यटकांना दिलासा मिळून कुंडेश्वर घाट अपघातमुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.



