बीड

बौद्ध समाजासाठी स्वतंत्र अधिकार व संरक्षणाची गरज – पू. भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

बौद्ध समाजासाठी स्वतंत्र अधिकार व संरक्षणाची गरज – पू. भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्यावतीने गौरव सोहळ्याचे आयोजन; बीडकर जनतेकडून मनःपूर्वक मानवंदना

बीड (दि. २१): बौद्ध समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी केंद्र शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावेत, बुद्धगया महाविहार बिहार स्वतंत्रपणे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात असावा आणि देशातील बौद्ध स्थळांचे व्यवस्थापन बौद्ध समितीकडे सोपवले जावे, अशी स्पष्ट मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी बीड येथे बोलताना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव महाराष्ट्राचा या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत १० जून २०२५ रोजी मुंबई येथे पू. महाथेरो यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाच्या निमित्ताने,  प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था आणि बीड शहरातील नागरिकांतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार, दिनांक १९ जुलै रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगरचे अभियंता आयु. बी.के.आदमाने होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून  प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सचिव, पू.भिक्खू धम्मशील थेरो, पू.भिक्खू पय्याथीस, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयु.पी.व्ही.बनसोडे, मेटा संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष आयु. संदीप उपरे, सनदी लेखापाल आयु. बी.बी. जाधव उपस्थित होते. यावेळी पू.महाथेरो यांना पुष्पगुच्छ, हार, चीवर व बुद्धमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढे पू.भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले, हा सन्मान माझ्यासाठी नसून, धम्माच्या कार्यात तन-मनाने समर्पित असलेल्या प्रत्येकासाठी आहे. मी हा गौरव धम्म, समाज आणि  शिक्षणाला समर्पित करतो. त्यांनी देशातील बौद्ध स्थळांच्या संरक्षणात पुरातत्व खात्याची भूमिका उदासीन असल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली, यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

मुख्य संयोजक पू.भिक्खू धम्मशील थेरो यांनी उपस्थित धम्मप्रेमी आणि उपासक-उपासिकांचे आभार मानताना पू. महाथेरो यांच्या कार्याची स्तुती केली. गुरु म्हणजे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि ज्ञानाचा अथांग सागर. संघर्ष, सातत्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर डॉ.महाथेरो यांनी आपले जीवन घडवले. गेली ५५ वर्षे ते समाजाला दिशा देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शिष्य घडले. अशा थोर गुरूंचा लाभ हीच आमची खरी संपत्ती आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

उपस्थित मान्यवरांनी पू. महाथेरो यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल, असा गौरवोद्गार काढला. त्यांचा सन्मान म्हणजे समस्त धम्मप्रेमींसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी प्रसंग ठरल्याचे मत बी.के.आदमाने यांनी मांडले. कार्यक्रमाला  प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपासक-उपासिका, विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button